पीटीआय, ढाका
माजी पंतप्रधान शेख हसीना पायउतार झाल्यानंतर बांगलादेशमध्ये तब्बल १८ महिन्यांनी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ‘बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टी’ (बीएनपी) या पक्षाने मोठा विजय मिळविला. ‘जमात-ए-इस्लामी’ या धर्मवादी पक्षाला नाकारताना बांगलादेशी नागरिकांनी बीएनपीच्या सुधारणावादी धोरणांच्या बाजूने कौल दिला. दोन दशकांनंतर बीएनपीने सत्ता मिळविली असून या पक्षाचे मुख्य नेते तारिक रहमान बांगलादेशचे नवे पंतप्रधान होणार आहेत. विशेष म्हणजे ३६ वर्षांनंतर या देशाला पुरुष पंतप्रधान लाभणार आहे.
बांगलादेशमध्ये ऑगस्ट २०२४ मध्ये झालेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर पंतप्रधान शेख हसीना यांचे सरकार उलथून लावण्यात आले. तेव्हापासून हंगामी सरकार बांगलादेशचा कारभार सांभाळत होते. या राजकीय उलाढालीनंतर बांगलादेशमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अभूतपूर्व अशा बंदोबस्तात पार पडलेल्या या निवडणुकीत ‘बीएनपी’ मोठ्या बहुमताने निवडून आली आहे.
‘बीएनपी’चे मुख्य नेते तारिक रहमान हे बांगलादेशचे नवे पंतप्रधान असतील, यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. हंगामी सरकारचे प्रमुख महंमद युनूस यांच्या जागी ते येतील. युनूस यांच्या काळात बांगलादेशचे भारताबरोबरील संबंध कमालीचे बिघडले होते. शेख हसीना यांचे भारतात येणे, बांगलादेशात अल्पसंख्य हिंदूंच्या हत्या, पाकिस्तानशी जवळीक आदी कारणांमुळे संबंधांमध्ये तणाव होता. रहमान सत्तेवर आल्यास दोन्ही देशांतील संबंध सुधारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, ‘बीएनपी’ला ३०० पैकी २०० हून अधिक जागा मिळाल्या आहेत, तर पाकिस्तानशी जवळीक असणाऱ्या ‘जमात-ए-इस्लामी’ या कट्टरपंथी पक्षाला साधारण ७५ जागा मिळाल्या आहेत. शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाला निवडणूक लढण्यास बंदी घालण्यात आली होती.
