Bangladesh Election Results: १८ महिन्यांपासून राजकीय अस्थिरतेचा सामना करणाऱ्या बांगलादेशमध्ये अखेर सार्वत्रिक निवडणूक पार पडली. १३ फेब्रुवारी रोजी लागलेल्या निकालात ‘बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टी’ (बीएनपी) या पक्षाने मोठा विजय मिळविला. दोन दशकांनंतर बीएनपीने सत्ता मिळविली असून या पक्षाचे मुख्य नेते तारिक रहमान बांगलादेशचे नवे पंतप्रधान होणार आहेत. दरम्यान बांगलादेशच्या निवडणुकीत बीजेपी पक्षाला एका जागेवर विजय मिळवण्यात यश आले आहे.

बांगलादेशमध्ये असलेला बीजेपी पक्ष हा सत्ताधारी बीएनपी पक्षाचा सहयोगी पक्ष आहे. बांगलादेश जातीय पक्ष (बीजेपी) असे या पक्षाचे नाव असून या पक्षाचे नेते अंदलीव रहमान हे भोला -१ या मतदारसंघातून निवडून आले आहेत, असे वृत्त बांगलादेशमधील माध्यम संस्था बीएसएसने दिले आहे.

आगरगाव येथील मतमोजणी केंद्रातून रहमान यांना मिळालेल्या मतांची आकडेवारीही देणअयात आले. अंदलीव रहमान यांना १,०५,५४३ मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी जमात-ए-इस्लामी पक्षाचे उमेदवार मोहम्मद नझरूल इस्लाम यांना ७५,३३७ इतकी मते मिळाली. बीजेपी पक्षाचा हा एकमेव विजय आहे.

सार्वत्रिक निवडणुकीबरोबरच ८४ मुद्द्यांच्या सुधारणांवरही सार्वमत घेतले गेले. भोला-१ या मतदारसंघातून १,४३,४७३ मतदारांनी ‘होय’ च्या बाजूने तर ४४,७३१ मतदारांनी ‘नाही’ असे मतदान केले.

जेन-झीच्या आंदोलनामुळे सत्तांतर

२०२४ मध्ये विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली जनरल-झेड चळवळ सुरू झाली. यामुळे माजी पंतप्रधान शेख हसीना यांना बांगलादेशमधून पलायन करावे लागले होते. त्यांनी भारतात आश्रय घेतल्यानंतर १८ महिन्यात ही पहिलीच निवडणूक झाली.

शेख हसीना देशाबाहेर गेल्यानंतर नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकारने अवामी लीगवर निर्बंध लादले. तसेच या पक्षाची नोंदणी रद्द करत यावेळी झालेल्या निवडणुकीत सहभागी होण्यापासून अवामी लीगला रोखले.

‘बीएनपी’चे मुख्य नेते तारिक रहमान हे बांगलादेशचे नवे पंतप्रधान असतील, यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. हंगामी सरकारचे प्रमुख महंमद युनूस यांच्या जागी ते येतील. माध्यमांतील वृत्तांनुसार, ‘बीएनपी’ला ३०० पैकी २०० हून अधिक जागा मिळाल्या आहेत, तर पाकिस्तानशी जवळीक असणाऱ्या ‘जमात-ए-इस्लामी’ या कट्टरपंथी पक्षाला साधारण ७५ जागा मिळाल्या आहेत.