Bangladesh Election Results 2026: बांगलादेशमध्ये गुरूवारी (१२ फेब्रुवारी) १३व्या संसदीय निवडणुकांसाठी मतदान पार पडले. शुक्रवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीने बहुमतापेक्षाही अधिक जागांवर आघाडी घेतली. बांगलादेशमधील स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या बातमीनुसार बीएनपी पक्षाने स्पष्ट बहुमताच्या दिशेने झेप घेतली आहे. २९९ पैकी २०० हून अधिक जागांवर तारिक रहमान यांचा बीएनपी पक्ष आघाडीवर आहे.

ऑगस्ट २०२४ मध्ये माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या ‘अवामी लीग’ पक्षाचे सरकार कोसळल्यानंतर नवीन सरकार निवडण्यासाठी बांगलादेशमधील जनतेने गुरुवारी महत्त्वपूर्ण सार्वत्रिक निवडणुकीत मतदान केले. गुरूवारी देशभरातील ३०० पैकी २९९ संसदीय मतदारसंघांमध्ये कडक बंदोबस्तात मतदान पार पडले. एका उमेदवाराचा मृत्यू झाल्यामुळे त्या मतदारसंघातील निवडणूक रद्द करण्यात आली.

बांगलादेशातील या निवडणुकीकडे भारतासह जगाचे लक्ष लागले होते. शेख हसीना यांना पदच्युत केल्यापासून बांगलादेशमध्ये राजकीय अस्थिरता होती. त्यातच डिसेंबरमध्ये विद्यार्थी नेता शरीफ उस्मान हादीचा मृत्यू झाल्यानंतर हिंसाचार उसळला होता. ज्यात अनेक हिंदूंची हत्या करण्यात आली. या पार्श्वभूमीवर बांगलादेशच्या राजकारणावर तीन दशके वर्चस्व राखलेल्या शेख हसीना आणि खालिदा झिया या दोन नेत्यांविना होणारी ही पहिलीच निवडणूक होती.

शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षावर या निवडणुकीत बंदी घालण्यात आली होती. तर त्यांच्या परंपरागत प्रतिस्पर्धी आणि बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीच्या प्रमुख नेत्या खालिदा झिया यांचे डिसेंबरच्या अखेरीस निधन झाले. त्यांचा मुलगा तारिक रहमान १७ वर्षांनंतर लंडनमधून बांगलादेशमध्ये परतला आणि त्याने या निवडणुकांचे नेतृत्व केले.

बीएनपीचा विजय भारतासाठी महत्त्वाचा?

‘बीएनपी’ हा भारताचा पारंपरिक मित्रपक्ष नाही. परराष्ट्र धोरणाबाबत ‘आम्ही मैत्री करू, गुलामी नाही’ ही त्यांच्या जाहीरनाम्यातील घोषणा भारताला उद्देशून असल्याचे मानले जाते. अर्थकारणाला मुत्सद्देगिरीच्या केंद्रस्थानी ठेवणे. विविध देशांबरोबर व्यापार वाढवणे, ‘सार्क’चे पुनरुज्जीवन, ‘आसियान’च्या सदस्यत्वासाठी प्रयत्न करणे, मुस्लीम देशांशी धोरणात्मक संबंध मजबूत करणे, म्यानमारमधून आलेल्या रोहिंग्या निर्वासितांच्या सुरक्षित पुनर्वसनासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाबरोबर काम करणे, बंगालच्या उपसागरात व्यापारवाढीसह नौदल क्षमता वाढवणे अशी अनेक महत्त्वाकांक्षी ध्येये ‘बीएनपी’ने ठेवली आहेत. यात तीस्ता आणि गंगा (बांगलादेशात पद्मा) नदीच्या पाणीवाटपाच्या प्रश्नाला महत्त्वाचे स्थान आहे. ‘बीएनपी’ सत्तेत आल्यास, पाणीवाटपावरून भारत आणि बांगलादेशतील ताण वाढू शकतो.