बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खलिदा झिया यांचं मंगळवारी सकाळी ६ च्या सुमारास निधन झालं. त्या ८० वर्षांच्या होत्या. बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीनं सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांच्या निधनाचं वृत्त जाहीर केलं. त्यांचे पु्त्र तारिक रेहमान हे नुकतेच तब्बल १७ वर्षांच्या परदेशी वास्तव्यानंतर बांगलादेशात परतले आहेत. बांगलादेशात नव्याने राजकीय समीकरणं मांडण्याचं आश्वासन रेहमान यांनी बांगलादेशी जनतेला दिलं आहे. मात्र, आई खलिदा झिया यांच्या निधनामुळे रेहमान यांना मानसिक धक्का बसला आहे.

खलिदा झिया या बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीच्या अध्यक्षा होत्या. रेहमान २५ डिसेंबर रोजी बांगलादेशमध्ये परतल्यानंतर त्यांनी पक्षाचं काम पाहायला सुरुवात केली आहे. आता खलिदा झिया यांच्या निधनानंतर रेहमान हेच पक्षाचे नवे अध्यक्ष होण्याची शक्यता आहे. सध्या रेहमान पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. अवघ्या दोन महिन्यांत बांगलादेशमध्ये १२ फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका पार पडणार आहेत. त्याआधीच खलिदा झिया यांचं निधन झाल्यामुळे याचा बांगलादेशातील आगामी राजकीय समीकरणांवर नेमका कोणता प्रभाव पडणार, याबाबत राजकीय विश्लेषकांकडून अंदाज लावले जात आहेत.

खलिदा झिया दीर्घकाळापासून आजारी

खलिदा झिया यांच्यावर गेल्या काही वर्षांपासून उपचार चालू होते. त्यांना यकृताचा आजार होता. शिवाय मधुमेह, आर्थ्रायटिस आणि हृदयाचाही आजार होता. त्यांना २३ डिसेंबर रोजी प्रकृती अस्वास्थ्यामुळे ढाका येथील एव्हरकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथेच उपचारांदरम्यान त्यांचं निधन झालं.

तीन वेळा बांगलादेशच्या पंतप्रधान

खलिदा झिया या तीन वेळा बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या. त्यात १९९१ ते ९६, १९९६ साली काही काळासाठी तर २००१ ते ०६ या काळात त्यांनी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळली. बांगलादेशात शैक्षणिक सुधारणा, आर्थिक सुधारणा व प्रशासकीय सुधारणांवर त्यांनी भर दिला होता. १९९१ साली बांगलादेशातील लष्करी राजवट संपुष्टा आल्यानंतर देशात निवडणुका झाल्या व बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीच्या उमेदवार खलिदा झिया या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या.

बांगलादेशात संसदीय पद्धतीची पुनर्स्थापना

१९९१ साली सत्तेत आल्यानंतर खलिदा झिया यांच्या सरकारने बांगलादेशात १२व्या घटनादुरुस्तीच्या मदतीने संसदीय लोकशाहीचं पुनरुज्जीवन केलं. त्यांची दुसरी टर्म अल्पकालीन ठरली. १९९६ साली निवडणुकांवर व्यापक बहिष्कारामुळे काळजीवाहू सरकार अस्तित्वात आलं. खलिदा झिया या सरकारच्या प्रमुख होत्या. त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये BNP पक्षाचा पराभव झाला व ते प्रमुख विरोधी पक्ष झाले. २००१ च्या निवडणुकांआधी बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीनं इतर तीन पक्षांशी आघाडी केली. या निवडणुकीत आघाडीला मोठं बहुमत मिळालं. त्यामुळे तिसऱ्यांदा खलिदा झिया बांगलादेशच्या पंतप्रधान झाल्या.

पुन्हा लष्करी राजवटीला सुरुवात…

दरम्यान, २००६ साली बांगलादेशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली. ऑक्टोबर महिन्यात झिया यांच्या सरकारचा कालावधी संपुष्टात आला. मात्र, राजकीय गोंधळामुळे काळजीवाहू सरकारची स्थापना करावी लागली. त्यानंतर लष्करानं राजकीय हस्तक्षेप करून आपल्या पाठिंब्याने अंतरिम सरकारची स्थापना केली. २००८ साली लष्कराच्याच मदतीने बांगलादेशात निवडणुका पार पडल्या.