Sheikh Hasina On Bangladesh Crisis: बांगलादेशमध्ये घडलेल्या हिंसाचाराच्या घटनानंतर शेख हसीना यांनी ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत देश सोडला. त्यानंतर शेख हसीना यांनी भारतात तात्पुरता आश्रय घेतला. बांगलादेशमध्ये सध्या नोबेल शांतता पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वात अंतरिम सरकार स्थापन झालेलं आहे. मात्र, यानंतरही अल्पसंख्याक हिंदूंवर अत्याचार होत असल्याच्या घटनाही समोर येत आहेत. तसेच बांगलादेशमध्ये घडलेल्या हिंसाचारामध्ये आंदोलकांनी शेख हसीना यांचे वडील शेख मुजीबुर रहमान यांच्या पुतळ्याची तोडफोड केली होती. या सर्व घटना घडल्यानंतर आणि बांगलादेश सोडल्यानंतर शेख हसीना यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया देत मौन सोडलं आहे. "माझ्या वडिलांचा आणि शहीदांचा घोर अपमान झाला", असं शेख हसीना यांनी म्हटलं. दरम्यान, बांगलादेश सोडल्यानंतर शेख हसीना यांनी त्यांचा मुलगा सजीब वाजेद यांच्यामार्फत जारी केलेल्या एका निवेदनाच्या माध्यमातून ही प्रतिक्रिया दिली. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे. हेही वाचा : हिंसाचार, हत्यांची चौकशी करा! शेख हसिना यांची मागणी, राजीनाम्यानंतर पहिलेच जाहीर वक्तव्य शेख हसीना यांनी काय म्हटलं? “आमच्या अस्तित्वाचा आधार असलेल्या त्या स्मारकाची तोडफोड करण्यात आली. राष्ट्रपिता शेख मुजीबुर रहमान यांचा अपमान करण्यात आला. लाखो हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानाचा अपमान झाला आहे. ज्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं, त्यांचा हा अपमान आहे. मी देशवासीयांकडून न्याय मागते", असं शेख हसीना यांनी म्हटलं आहे. "बांगलादेशमध्ये घडलेल्या हिंसाचारामुळे विद्यार्थी, शिक्षक, पोलीस, पत्रकार, सांस्कृतिक कार्यकर्ते आणि निष्पाप लोकांचा जीव गेला. माझ्यासारखे जे प्रियजन गमावण्याच्या दुःखाने जगत आहेत, त्यांच्याबद्दल मी मनापासून शोक व्यक्त करते", असंही शेख हसीना यांनी म्हटलं आहे. शेख मुजीबुर रहमान यांच्या १५ ऑगस्ट १९७५ रोजी झालेल्या हत्येने मोठा धक्का बसला होता, आणि आता बांगलादेशमध्ये घडलेल्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये विद्यार्थ्यांसह अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला, या घटनांबाबत दु:ख व्यक्त करत चौकशी करून दोषींना शिक्षा मिळण्याची मागणीही शेख हसीना यांनी केली आहे. अंतरिम सरकारसमोर आव्हान काय? बांगलादेशमधील अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून मोहम्मद युनूस यांनी जबाबदारी स्वीकारली आहे. शेख हसीना यांनी राजीनामा देऊन देशातून पलायन केल्यानंतर मोहम्मद युनूस यांनी देशाच्या कारभाराची सूत्रे आपल्या हातात घ्यावी, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली होती. त्यानंतर मोहम्मद युनूस यांनी अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून जबाबदारी घेतली. असं असलं तरी मोहम्मद युनूस यांच्यावर अर्थात अंतरिम सरकारसमोर बांगलादेशमध्ये चालू असलेला हिंसाचार थांबवण्यासह अनेक आव्हान असणार आहेत.