Sheikh Hasina Son Sajeeb Wazed Joy Statement: “बांगलादेश आता एक अपयशी देश बनत चालला असून तो दुसरा पाकिस्तान होत आहे”, असे विधान बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे सुपुत्र आणि अवामी लीगचे वरीष्ठ नेते साजीब वाजेद जॉय यांनी केले आहे. बांगलादेशमधून पदच्युत झालेल्या शेख हसीना यांनी ५ ऑगस्ट रोजी पहिल्यांदा सार्वजनिकरित्या भारतातून संवाद साधला. तसेच यावर्षी डिसेंबर महिन्यात त्या बांगलादेशमध्ये परतण्याची तयारी करत आहेत. शेख हसीना यांच्याबरोबरच जॉय यांनीही संवाद साधला होता. त्यात बोलत असताना त्यांनी बांगलादेशबद्दल चिंता व्यक्त केली.
नवी दिल्लीच्या ‘फॉरेन करस्पाँडंट्स क्लब ऑफ साउथ एशिया’ने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात शेख हसीना आणि जॉय यांनी ऑनलाइन सहभाग घेतला होता. अमेरिकेच्या मॅरीलँड येथून साजीब वाजेद जॉय बोलत होते. २०२४ मध्ये बांगलादेशमध्ये शेख हसीना यांची सत्ता उलथवली गेली. त्यानंतर बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले आहेत, असे जॉय यांनी यावेळी सांगितले.
आंतरराष्ट्रीय समुदायाने आताच हस्तक्षेप केला नाही तर बांगलादेश या क्षेत्रातील सर्वात मोठे दहशतवादाचे केंद्र बनू शकते. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय बांगलादेशमध्ये काम करत आहे, असा आरोप जॉय यांनी केला. तसेच अवामी लीग पक्षाचे सरकार असताना अटक केलेले किंवा तुरुंगात असलेल्या शेकडो अतिरेक्यांना मुक्त करण्यात आले आहे, असाही दावा त्यांनी केला.
‘बांगलादेश दुसरा पाकिस्तान बनला आहे’
भारताच्या पूर्वेकडील सीमेला लागून असलेला बांगलादेश आता दुसरा पाकिस्तान बनला आहे, असे सांगून जॉय यांनी हा भारतासाठी सुरक्षेच्या दृष्टीने धोका असल्याचे म्हटले. जॉय यांनी पुढे म्हटले की, जर ही परिस्थिती बदलली नाही तर जगातील पुढचे अतिरेकी हे बांगलादेशमधून तयार होतील. भारतातील माध्यमांनी यावर विशेष लक्ष देऊन वार्तांकन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
बांगलादेशमध्ये फेब्रुवारी २०२६ मध्ये सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीचा (BNP) या पक्षाने विजय मिळवला. त्यापूर्वी अंतरिम सरकार चालविणाऱ्या मोहम्मद युनूस यांनी शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षावर निवडणूक लढविण्यास बंदी घातली होती. या निवडणुकीवर जॉय यांनी आक्षेप घेतला होता.
मोहम्मद युनूस यांच्या राजवटीत बांगलादेशची अर्थव्यवस्था कोलमडली आणि ते एक अराजक राष्ट्र बनू लागले, असाही आरोप जॉय यांनी केला. शेख हसीना यांना पदच्युत केल्यानंतर बांगलादेशमध्ये हत्यांचे सत्र सुरू झाले. सरकारने ५ ऑगस्ट २०२४ पासून राजकीय हत्यांना कायदेशीर मान्यता दिली. जुलै २०२४ मधील आंदोलनात मारल्या गेलेल्या लोकांच्या संख्येवर जॉय यांनी प्रश्न उपस्थित केला.
जॉय यांनी सांगितले की, संयुक्त राष्ट्राच्या अंदाजानुसार या आंदोलनात जवळपास १४०० लोक मृत्यूमुखी पडले होते. तर सरकारने मात्र हा आकडा ८०० असल्याचे म्हटले. मग वरील ६०० लोक कोण होते? अवामी लीग पक्षाने मृतांच्या नावाची माहिती मागितली पण दिली गेली नाही, असेही जॉय म्हणाले.
