Bangladesh Curfew : बांगलादेशमध्ये सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण रद्द करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाने हिंसक वळण घेतले. त्यानंतर देशभर पसरलेल्या या आंदोलनात आतापर्यंत १०५ जणांचा बळी गेला आहे. हिंसेवर प्रतिबंध आणण्यासाठी आता देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. बांगलादेशमध्ये १५००० भारतीय नागरिक असून त्यापैकी ८,५०० विद्यार्थी आहेत, अशी माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी दिली. हे सर्व लोक सुखरूप असल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या ४०५ विद्यार्थ्यांना बांगलादेशमधून बाहेर काढले गेले आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पुन्हा एकदा सत्तेची सूत्र हाती घेतल्यानंतर देशात अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारी नोकऱ्यांमध्ये सध्या जे आरक्षण धोरण आहे, ते बदलण्याची आंदोलकांची मागणी आहे. बांगलादेशमधील वृत्तवाहिनीवर देशाला संबोधित करत असताना पंतप्रधान शेख हसीना यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना चर्चेचे निमंत्रण दिले आहे. चर्चेतून शांततेने मार्ग काढू, असे त्या म्हणाल्या. पण सध्या ज्यापद्धतीने आंदोलन पेटले आहे, ते पाहता विद्यार्थी चर्चेचे निमंत्रण स्वीकारतील, असे दिसत नाही. हे वाचा >> विश्लेषण: बांगलादेशात विद्यार्थी आंदोलन का करत आहेत? देशाच्या आरक्षण प्रणालीमध्ये मुलभूत बदल करण्याची मागणी करत गेल्या आठवडाभरापासून ढाक्यासह विविध शहरांमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. दोन दिवसांपासून आंदोलन अधिकाधिक हिंसक होत असून गुरुवारी राजधानीच्या अनेक भागांत जाळपोळ आणि तोडफोडीला उधाण आले. आंदोलकांनी सरकारी इमारती तसेच विद्यापीठांना लक्ष्य केले. दूरचित्रवाणी केंद्राच्या फाटकाची मोडतोड करण्यात आली, तर परिसरातील वाहनेही जमावाने पेटवून दिली. मंगळवारी हिंसाचारात सात जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मागच्या पाच दिवसांत ही संख्या आता १०५ वर पोहोचली आहे. आंदोलकांची मागणी काय? बांगलादेशमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये ५६ टक्के आरक्षण आहे. यातील सर्वाधिक ३० टक्के आरक्षण हे १९७१च्या स्वातंत्र्यात योगदान देणाऱ्या ‘मुक्तिवाहिनी’ आंदोलकांच्या वारसदारांना देण्यात आले आहे. नोकऱ्यांमधील आरक्षण हटविण्याची आंदोलक मागणी करीत आहेत. तर सध्या हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने तेथील निकालाची प्रतीक्षा करावी, असे शेख हसिना यांच्या सरकारचे म्हणणे आहे. वादग्रस्त विधानामुळे आंदोलन चिघळले? शेख हसीना या बांगलादेशच्या पंतप्रधानपदी चौथ्यांदा निवडून आल्या आहेत. ‘‘स्वातंत्र्यसैनिकांची मुले, नातवंडे प्रतिभावान नाहीत का? रझाकारांची मुले, नातवंडेच फक्त प्रतिभावान आहेत का?’’ असा सवाल पत्रकार परिषदेत करत त्यांनी आंदोलकांना ‘रझाकार’ म्हणून हिणवले. रझाकार हा अरबी शब्द असून त्याचा शब्दश: अर्थ ‘स्वयंसेवक’ असा आहे. मात्र बांगलादेशात हा शब्द हीन भावनेतून वापरला जात असून त्याचा अर्थ ‘देशद्रोही’ असा होतो. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल टिक्का खान यांनी अवामी लीगच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली मुक्ती चळवळ चिरडण्यासाठी ‘रझाकार’ या निमलष्करी दलाची स्थापना केली. पाकिस्तानी सशस्त्र दलांसोबत काम करताना या दलाने बांगलादेशींवर अक्षरश: अत्याचार केले. त्यामुळे बांगलादेशात रझाकार या शब्दाला हीन छटा आहे. हसीना यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना ‘रझाकार’ असे संबोधल्याने आंदोलन अधिक पेटले.