Muhammad Yunus Seven Sisters statement: बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) चे अध्यक्ष, तारिक रहमान मंगळवारी बांगलादेशचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. यापूर्वी बांगलादेशचे अंतरिम सल्लागार मुहम्मद युनूस यांनी राजीनामा दिल्यानंतर देशाला उद्देशून भाषण केले. या भाषणात युनूस यांनी सेव्हन सिस्टर्सचा उल्लेख केला. नेपाळ, भूतान आणि सेव्हन सिस्टर्सचा युनूस यांनी सामायिक प्रदेश म्हणून उल्लेख केला पण, भारताचा थेट उल्लेख टाळला.

तारिक रहमान आज पंतप्रधान म्हणून शपथ घेणार

बांगलादेशमध्ये नुकत्याच पार पडलेल्या सार्वजनिक निवडणुकांमध्ये बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीला मोठं यश मिळाले. निकालानंतर खालिदा झिया यांचे पूत्र आणि बीएनपीचे अध्यक्ष तारिक रहमान पंतप्रधान म्हणून आज शपथ घेणार आहेत. त्यापूर्वी बांगलादेश अंतरिम सरकारचे सल्लागार मुहम्मद युनूस यांनी राजीनामा दिला. यानंतर युनूस यांनी देशाला उद्देशून भाषण दिले. यावेळी त्यांनी सागरी मार्गद्वारे प्रादेशिक संपर्क वाढवण्यासह प्रादेशिक अर्थकारणावर भर दिला.

काय म्हणाले मुहम्मद युनूस?

“आपला खुला समुद्र केवळ भौगोलिक सागरी सीमा नसून, जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडले जाण्याचा मार्ग आहे. नेपाळ, भूतान आणि सेव्हन सिस्टर्ससह सर्व क्षेत्रात आर्थिक समृद्धीच्या अनेक शक्यता आहेत. आर्थिक क्षेत्र, व्यापार करार आणि शुल्क मुक्त बाजार या क्षेत्राला जागतिक केंद्र बनवू शकते”, असे मुहम्मद युनूस म्हणाले. 

मुहम्मद यांच्याकडून जाणीवपूर्वक उल्लेख

मुहम्मद युनूस यांनी भाषणात जाणूनबुजून सेव्हन सिस्टर्सचा उल्लेख केल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. या भौगोलिक प्रदेशातील आर्थिक शक्यतांचा उल्लेख जाणीवपूर्वक केल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, भारत नेहमीच याला विरोध करत आला आहे. मुहम्मद युनूस यांनी २०२५ मध्ये केलेल्या चीन दौऱ्यात चीनसोबत सहकार्य वाढविण्यास सकारात्मकता दर्शवली होती. यावेळी देखील युनूस यांनी भारतातील सात राज्यात चीन बांगलादेशमार्गे व्यापार विस्तार करु शकतो, असे युनूस म्हणाले होते. भारताच्या शेजारी देशात तसेच प्रदेशांत चीनचा वाढता प्रभाव देशासाठी चिंताजनक ठरत आहे.