“इस्लाम हा आमच्या देशाचा धर्म नाही”; दुर्गापूजेतील हिंसाचारावर बांगलादेशी मंत्र्यांची प्रतिक्रिया!

बांगलादेशमध्ये दुर्गापूजेदरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशच्या केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.

bangladesh minister on durgapuja violence

बांगलादेशमध्ये दुर्गापूजा उत्सवादरम्यान झालेला हिंसाचार आणि अज्ञात धर्मांधांनी केलेली तोडफोड या घटनांमुळे भारतातून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या घटनेमध्ये ४ जण ठार झाले असून अनेक जखमी झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे बांगलादेशमध्ये धार्मिक कट्टरतावाद वाढू लागल्याची टीका होऊ लगली आहे. या पार्श्वभूमवीर आता बांगलादेशचे माहिती व प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. विशेषत: धार्मिक कट्टरतेवर तीव्र आक्षेप घेतानाच इस्लाम हा आमच्या देशाचा धर्म नाही, अशी देखील भूमिका त्यांनी स्पष्ट केलं आहे. देशानं पुन्हा एकता १९७२ च्या राज्यघटनेनुसार राज्यकारभार करण्यची गरज देखील त्यांनी व्यक्त केली.

धार्मिक कट्टरतावाद्यांवर तीव्र टीका

दुर्गापूजा उत्सवादरम्यान झालेल्या हिंसाचाराबाबत बोलताना मुराद हसन म्हणाले, “बांगलादेश धार्मिक कट्टरतावाद्यांसाठी खुलं मैदान होऊ शकत नाही. आपल्यामध्ये देशासाठी लढा दिलेल्या स्वातंत्र्ययोद्ध्यांचं रक्त आहे. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला पुन्हा १९७२ च्या राज्यघटनेकडे परत जावं लागणार आहे. यासंदर्भात मी संसदेत देखील बोलणार आहे. यावर कुणीही बोललं नाही, तरी मी त्यावर बोलेन” अशी ठाम भूमिका मुराद हसन यांनी मांडली आहे.

१९७२ ची राज्यघटना पुन्हा लागू होणार?

बांगलादेश स्वतंत्र झाल्यानंतर त्यांचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाणारे शेख मुजीबुर रेहमान यांच्या काळात तयार करण्यात आलेली १९७२ ची राज्यघटना देशात पुन्हा लागू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. “मला वाटत नाही की इस्लाम हा आपला राष्ट्रीय धर्म आहे. आपण १९७२ च्या राज्यघटनेकडे पुन्हा जाऊ. पंतप्रधान शेख हसीना यांच्या नेतृत्वाखाली आपण त्यासंदर्भातलं विधेयक संसदेत मंजूर करून घेऊ”, असं मुराद हसन म्हणाले.

धर्मनिरपेक्ष बांगलादेश

दरम्यान, बांगलादेश धर्मनिरपेक्ष राष्ट्र असल्याचा दावा यावेळी मुराद हसन यांनी केला. “बांगलादेश हे एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. इथे प्रत्येकाला आपापल्या श्रद्धा जोपासण्याचा अधिकार आहे”, असं ते म्हणाले.

नेमकं काय झालं?

माध्यमांच्या वृत्तांनुसार, चांदपूरच्या हाजीगंज उपजिल्ह्य़ात धर्माध व पोलीस यांच्यात बुधवारी झालेल्या संघर्षांत किमान ४ जण ठार, तर अनेक जण जखमी झाले. हाजीगंज येथे मेळावे आयोजित करण्यावर अधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ढाक्यापासून सुमारे १०० किलोमीटर अंतरावरील कुमिला येथे दुर्गापूजा मंडपात ईश्वरनिंदेची कथित घटना घडल्याचे पोलिसांना कळवण्यात आल्यानंतर त्यांनी तपास सुरू केला. तथापि, धर्माधांनी कुमिलातील काही भाग, लगतचे हाजीगंज व हटिया व बंसखली येथील मंदिरांवर हल्ले केल्यानंतर हिंसाचार उफाळला. धार्मिक तणाव भडकावण्यासाठी समाजमाध्यमांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला.

बांगलादेशात दुर्गापूजा उत्सवादरम्यान हिंदू मंदिरांवर झालेल्या हल्ल्यांवर मोदी सरकारकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

हा हिंसाचार म्हणजे दुर्गापूजा उत्सव उधळून लावण्याचे कारस्थान असल्याचा आरोप करतानाच; धर्माधावर कारवाई करावी आणि हिंदू मंदिरांचे संरक्षण करावे, अशी मागणी हिंदू नेत्यांनी केली.

दुर्गापूजा थांबवण्यासाठी निदर्शने करून एका विशिष्ट गटाने पूजा मंडपात ईश्वरनिंदा केल्याचे कुमिला जिल्हा पूजा समितीच्या सचिवांनी सांगितले. लोकांनी कायदा आपल्या हातात घेऊ नये असे आवाहन करणारी तातडीची सूचना धार्मिक व्यवहार मंत्रालयाने जारी केली आणि धार्मिक ऐक्य व शांतता कायम राखण्याचेही आवाहन केले. बांगलादेशातील धर्माधांनी ढाक्यापासून १०० किलोमीटर अंतरावरील कुमिलातील काही भाग, लगतचे हाजीगंज व हटिया व बंसखली येथील मंदिरांवर हल्ले केल्यानंतर हिंसाचार उफाळला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bangladesh minister says islam is not our state religion on durga puja violence pmw

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य
ताज्या बातम्या