बांगलादेशच्या एका खासदाराची कोलकत्त्यात हत्या करण्यात आली. अन्वारुल अझीम अनार यांची राजारहाटच्या फ्लॅटमध्ये कातडी कापून हत्या केली गेली. त्यांची हत्या झाल्यानंतर मारेकऱ्यांनी खासदाराचे ४.३ लाख रुपये पळवले. तसंच, त्यातील एका मारेकऱ्याने खासदाराच शर्ट घालून पलायन केले. राज्य सीआयडीच्या संयुक्त पथकाने ही माहिती दिल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

नेपाळमध्ये लपून बसल्याचा संशय असलेल्या आरोपी मोहम्मद सियाम हुसैन उर्फ भोला याने पैसे काढून घेतल्याचा दावा तपास अधिकाऱ्यांनी केला आहे. तर, या प्रकरणातील मुख्य आरोपी अख्तरज्जमान शाहीन हा यापूर्वीच अमेरिकेत पळून गेल्याचा संशय आहे. जिहाद हवालदार (२४) याने दावा केला की १३ मे रोजी रात्री शरीराचे विच्छेदन आणि चिरडणे सुरू होते. शरीराचे तुकडे करताना मारेकऱ्यांनी मद्यप्राशन केलं होतं. दुसऱ्या दिवशी जिहाद खासदाराच्या कपड्यात घराबाहेर पडला होता. कारण त्याचे कपडे रक्ताने माखले होते.

हेही वाचा >> Video: बांगलादेशी खासदाराची भारतात हत्या, मृतदेहाचे तुकडे करून विल्हेवाट; हनीट्रॅपमध्ये अडकून गमावला जीव, CCTV Viral!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी ३ च्या सुमारास बांगलादेशचे खासदार अन्वारुल अझीम अनार हे शिमुल भुनियान आणि फैजल यांच्यासोबत फ्लॅटमध्ये गेले. सेलेस्टी रहमान वरच्या मजल्यावरील खोलीत होते. ते तिघे (खासदार, फैसल आणि अमानुल्ला) त्यांचे बूट बाहेर टाकून फ्लॅटमध्ये गेले. आतमध्ये जिहाद हवालदार, सयाम उपस्थित होते.

खोलीत प्रवेश करताच खासदाराला क्लोरोफॉर्मने बेशुद्ध केले गेले. त्यानंतर त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. तिथे एक सीसीटीव्ही कॅमेराही होता. जो सेलेस्टीने आधीच कापड आणि चिकट पट्टीने झाकला होता, अशी माहिती जिहादने दिली. हत्येनंतर मृतदेह स्वयंपाकघर किंवा बाथरुममध्ये नेण्यात आला. तिथं त्यांच्या शरीराचे तुकडे केले गेले. हाडे आणि मांस वेगळे केले आणि वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये पॅक केले.

गुप्तचर विभागाने सीसीटीव्ही फुटेजचा आढावा घेतल्यानंतर सांगितलं की दुपारी चारच्या सुमारास खासदाराचे बूट आत नेण्यात आले. भंगारमधील बागजोला कालव्यातील कृष्णमती पुलाजवळ मृतदेहाची विल्हेवाट लावली होती. गावताळा मार्केटजवळ खासदारांचा मोबाईल फोन आणि कपडे टाकून दिले. कवटीचे तुकडेही तलावात फेकण्यात आले. सयामने खासदाराचे सीमकार्ड घेऊन नेपाळच्या दिशेने पळाला. परंतु, बिहारमधून जाताना त्याने ते सीम सुरू केले त्यामुळे त्या सीमचं लोकेशन मुझ्झफरनगर येथे दाखवत होते.

अख्तरुझमन फरार, महिलेसह तिघे अटकेत

दरम्यान, या गुन्ह्याचा मास्टरमाईंड अख्तरुझमन हत्या झाल्याच्या दिवसापासून भारतातून पळून गेल्याचं उघड झालं आहे. घटनेनंतर दोन दिवसांनी पश्चिम बंगाल सीआयडीनं जिहाद हवालदारला अटक केलं. मृतदेहाचे तुकडे केल्याची हवालदारनं पोलिसांना कबुली दिली. त्यापाठोपाठ सिलास्ती रेहमान आणि तिच्या दोघा साथीदारांनाही पोलिसांनी अटक केली. या सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर केलं असता त्यांची १२ दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. अजूनही अझीम यांच्या मृतदेहाचे सर्व भाग पोलिसांना सापडले नसून आरोपींच्या चौकशीतून शोधमोहीम चालू आहे.