गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानची परिस्थिती खूप हलाखीची झालेली आहे. सर्वसामान्य जनतेला जीवनावश्यक वस्तू घेणंही मुश्किल होत चाललं आहे. महागाईने पाकिस्तानात उच्चांक गाठला आहे. पाकिस्तान ऊर्जा संकटाचाही सामना करत असून वीज संकट दिवसेंदिवस गंभीर होत चाललं आहे. अशाच प्रकारची परिस्थिती आता बांगलादेशातही सुरू आहे.

बांगलादेश सध्या गंभीर ऊर्जा संकटाचा सामना करत आहे. बांगलादेशात मोठ्या प्रमाणावर वीज कपात करण्यात येत आहे. परिस्थिती एवढी गंभीर झाली आहे की, बांगलादेशातील अनेक शहरातील सर्व मॉल्स, दुकाने आणि बाजारपेठा रात्री ८ वाजेपर्यंतच खुल्या ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बांगलादेश सरकारने वीज बचतीसाठी शॉपिंग मॉल्स, दुकाने, बाजारपेठा रात्री ८ वाजेपर्यंतच खुल्या ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे वाढत्या वीज टंचाईचा फटका बांगलादेशातील व्यावसायिक, शेतकरी आणि उद्योगांनाही बसत आहे. या संकटावर मात करण्यासाठी बांगलादेशने भारताकडे मदतीची धाव घेतली असून अतिरिक्त डिझेल पुरवठ्याची मागणी केली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

वृत्तांनुसार, ढाका शहराबाहेरील ग्रामीण भागात वीज टंचाईचा सर्वाधिक फटका बसत आहे. तब्बल ८ ते १० तासांपर्यंत वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे, म्हणजे तब्बल ८ ते १० तासांपर्यंत लोडशेडिंग सुरू आहे. त्यामुळे लोकांना मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागत आहे.

नागरिकांचे वीज यंत्रणेच्या केंद्रांवर हल्ले

एका वृत्तानुसार, बांगलादेशात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या लोडशेडिंगमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी काही भागांत वीज यंत्रणेच्या केंद्रांवर हल्ले केले आहेत. त्यामुळे बांगलादेशातील काही वीज यंत्रणेच्या उपकेंद्रांवर आणि वीज कार्यालयांसाठी पोलीस संरक्षण देण्याची वेळ आली आहे. सैदपूर, निलफामारी आणि कुश्तिया या ठिकाणी तर तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. तसेच काही ठिकाणी थकीत वीज बिलांची वसुली करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवरही हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत.