ढाका : बांगलादेशचे अध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन यांनी मंगळवारी ‘जातीय संसद’ (बांगलादेशचे सर्वोच्च कायदेमंडळ) विसर्जित केली. त्यामुळे आधी हंगामी सरकार स्थापन करण्याचा आणि नंतर नव्याने सार्वत्रिक निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विद्यार्थी आंदोलन चिघळल्याने शेख हसीना यांनी राजीनामा देऊन देश सोडल्यानंतर अराजकाची परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे वृत्त आहे. १६ जुलैपासून हिंसाचारातील मृतांचा आकडा ४४०वर गेला आहे. राष्ट्राध्यक्ष कार्यालयाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, अध्यक्ष शहाबुद्दीन यांनी एक कार्यकारी आदेश काढून ‘जातीय संसद’ विसर्जित केली. अध्यक्षांनी लष्कराचे तिन्ही दलप्रमुख, विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि ‘अँटी-डिस्क्रिमिनेशन स्टुडंट मूव्हमेंट’च्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. लवकर संपूर्ण हंगामी सरकारची घोषणा केली जाण्याची अपेक्षा असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हेही वाचा >>> हसीना यांचा मुक्काम वाढला; लंडनला जाण्यामध्ये ‘तांत्रिक अडचणी’; गरज असेल तोपर्यंत पाहुणचाराची भारताची तयारी बांगलादेशात १ जुलैपासून अटक करण्यात आलेल्यांची सुटका करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अनेक निदर्शकांची यापूर्वीच मुक्तता झाली असून अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक एकेएम शाहिदूर रहमान यांची पोलीस दलाचे समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, देशात चिघळलेली परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सैन्याकडून केले जात असल्याचे सांगण्यात आले. ढाक्यात मंगळवारी वातावरण बरेचसे निवळले असून परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे. पोलीस आणि सैन्याचे जवान रस्त्यांवर गस्त घालत आहेत असे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले. मंगळवारी बस आणि इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू झाली, तसेच दुकानेही उघडली होती. सरकारी कार्यालये सुरू झाली असून बॅटरींवर चालणाऱ्या रिक्षाही रस्त्यावर धावू लागल्या आहेत. विद्यार्थी आणि देशाची जनता इतका त्याग करू शकते, तर आपलीही काही जबाबदारी आहे, असे सांगत नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ मोहम्मद युनूस यांनी हसीना यांच्या राजीनाम्याचे स्वागत केले आहे. हेही वाचा >>> Sheikh Hasina : शेख हसीना यांचे पती होते शास्त्रज्ञ, मुलगी WHO ची संचालक, कुटुंबाविषयी या गोष्टी माहीत आहेत का? दुसऱ्या दिवशीही नासधूस ढाक्यात शेख हसीना यांचे खासगी निवासस्थान असलेल्या सुधा सदन आणि इतर आस्थापनांवरही हल्ला करून नासधूस करण्यात आली. तसेच त्याला आग लावण्यात आली. अवामी लीगचे अन्य नेते, मंत्री आणि लोकप्रतिनिधी यांच्या ढाक्यातील आणि शहराबाहेरील घरांवरही हल्ले करण्यात आले. जोशोर जिल्ह्यातील अवामी लीगच्या नेत्याच्या मालकीच्या हॉटेलला आग लावण्यात आली. त्यामध्ये किमान २४ जणांचा होरपळून मृत्यू झाला अशी माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली. मोहम्मद युनूस यांच्याकडे नेतृत्व? ‘ग्रामीण बँके’च्या माध्यमातून बांगलादेशच्या अर्थकारणात लक्षणीय बदल घडवून आणलेले, नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांनी हंगामी सरकारचे नेतृत्व करावे असा प्रस्ताव ‘स्टुडंट्स अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन’ या विद्यार्थी संघटनांच्या समूहाने मांडला आहे. युसून यांनी बांगलादेश वाचवण्यासाठी जबाबदारी घेण्याची तयारी दर्शवल्याचा दावाही संघटनेचे नेते नाहिद इस्लाम यांनी केला आहे. युनूस सध्या देशाबाहेर असून त्यांनी ताज्या घडामोडींचे वर्णन ‘देशाचे दुसरे स्वातंत्र्य आहे,’ असे केले आहे. हसीना सरकारने २००८पासून युनूस यांच्यामागे चौकशींचा ससेमिरा लावला होता. यंदा जानेवारीमध्ये न्यायालयाने त्यांना सहा महिन्यांची शिक्षा सुनावली होती. ढाका येथील ‘जातीय संसदे’च्या सभागृहाबाहेर आंदोलक विद्यार्थी मोठ्या संख्येने जमा झाले होते.