Bangladesh Protests : बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार उसळल्यानंतर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आज (५ ऑगस्ट) पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर शेख हसीना यांनी देश सोडत सुरक्षित स्थळी रवाना झाल्या. त्यावेळी शेख हसीना या बांगलादेश हवाई दलाच्या एका विमानाने रवाना झाल्या. मात्र, त्यानंतर शेख हसीना यांचं फ्लाइट Flightradar24 वर सर्वाधिक ट्रॅक केलं गेलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बांगलादेशमधील हिंसाचार पाहता आणि परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेल्यानंतर शेख हसीना यांनी देश सोडला. बांगलादेशमधून निघाल्यानंतर त्या कुठे गेल्या असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. याबाबत अनेकांनी माहिती सर्च केली. यावेळी शेख हसीना यांना घेऊन जाणारे बांगलादेश हवाई दलाचे AJAX1431 फ्लाइट Flightradar24 वर सर्वाधिक ट्रॅक केलं गेलं. त्यामुळे बांगलादेश हवाई दलाचे AJAX1431 फ्लाइट जगातील सर्वाधिक ट्रॅक केलं गेलेलं विमान ठरलं असल्याचं इंडिया टुडेनी म्हटलं आहे. दरम्यान, शेख हसीना या सध्या भारतात दाखल झाल्या आहेत. बांगलादेशच्या हवाई दलाच्या एका विमानाने त्या गाझियाबादमधील भारतीय हवाई दलाच्या हिंडन या एअरबेसवर (वायूदलाचा तळ) दाखल झाल्या.

हेही वाचा : Sheikh Hasina : शेख हसीना भारतात अजित डोभाल यांना भेटल्या, पुढची रणनीती ठरली?

यानंतर हिंडन एअरबेसवर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांना भेटल्या. तसेच त्यांनी भारतीय लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. सध्या भारतीय वायूदल आणि भारतीय संरक्षण यंत्रणा शेख हसीना यांना सुरक्षा प्रदान करत आहे. त्यांना भारतात सुरक्षित स्थळी नेलं जाण्याची शक्यता आहे.

शेख हसीना लंडनला रवाना होणार?

बांगलादेशमध्ये हिंसाचार उसळल्यानंतर शेख हसीना यांनी आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देत त्या भारतात दाखल झाल्या आहेत. त्या भारतात आल्यानंतर त्यांच्याशी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी त्यांची भेट घेत त्यांच्याशी बांगलादेशमधील परिस्थितीवर चर्चा केली. मात्र, शेख हसीना या लंडनला रवाना होण्याची शक्यता सूत्रांच्या माहितीनुसार काही वृत्तसंस्थांनी दिली आहे. पण याबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

आंदोलकांनी शेख हसीना यांचं कार्यालय जाळलं

दरम्यान, बांगलादेशमध्ये चालू असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत १०० पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला आहे. आंदोलकांनी शेख हसीना यांचं कार्यालयही जाळलं आहे. हसीना यांनी देश सोडल्यानंतर बांगलादेशच्या लष्करांने प्रशासनावर तात्पुरता ताबा घेतला आहे. आरक्षणाच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाचं रूपांतर हिंसाचारात झालं. यानंतर सध्या बांगलादेशमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. बांगलादेशमधील इंटरनेट सेवा देखील अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bangladesh protests bangladesh air force flight becomes most tracked flight sheikh hasina gkt
Show comments