बांगलादेशातील रोहिंग्यांवर शुक्रवारी झालेल्या गोळीबारात सात जण ठार झाल्याचे वृत्त आहे. वृत्तसंस्था एएफपीने बांगलादेश पोलिसांच्या हवाल्याने ही माहिती दिली. बांगलादेशचे आघाडीचे वृत्तपत्र ढाका ट्रिब्यूनने दिलेल्या माहितीनुसार, रोहिंग्या निर्वासित शिबिरात असलेल्या मदरशात हा हल्ला झाला, जिथे अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या गोळीबारात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, उखिया येथील कॅम्प क्रमांक १८ च्या ब्लॉक एच -५२ मधील मदरशावर अज्ञात व्यक्तींनी पहाटे चार वाजता हल्ला केला. यापूर्वी या हल्ल्याचे वर्णन दोन प्रतिस्पर्धी रोहिंग्या गटांमधील संघर्ष म्हणून करण्यात आले होते.

उखियाचे एसपी शिहाब कैसर यांनी स्थानिक माध्यमांना याबाबत माहिती दिली आहे. हल्ल्यानंतर लगेचच चार लोकांचा मृत्यू झाला. काही वेळातच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि लोकांना रुग्णालयात नेले. येथे तीन लोकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी एका हल्लेखोराला बंदूक आणि दारूगोळ्यासह अटक केली आहे. याशिवाय इतर आरोपींना पकडण्यासाठी छावणीत छापे टाकण्यात येत आहेत.