भारत आणि बांगलादेशच्या संबंधांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान हे भारत दौऱ्यावर येणार होते. मात्र, अचानक त्यांचा हा दौरा रद्द झाला. त्यानंतर दिल्लीतील ब्रिक्स शिखर परिषदेत रहमान सहभागी होतील अशा चर्चा होत्या. मात्र, ब्रिक्स परिषदेलाही ते उपस्थित राहिले नाही.

दरम्यान, आता भारतात ब्रिक्स परिषद पार पडल्यानंतर तारिक रहमान यांनी भूमिका बदलल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. कारण भारताशी द्विपक्षीय संबंध पुन्हा सुधारण्याबाबत तारिक रहमान यांच्या सरकारमधील मंत्र्यांनी भूमिका मांडली आहे.

बांगलादेशचे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री हुमायूं कबीर यांनी भारत आणि बांगलादेश यांच्यातील द्विपक्षीय संबंध सुधारण्याबाबत भूमिका मांडली आहे. दोन्ही देशांमधील नवीन संबंध परस्पर हिताच्या आधारावर उभारले गेले पाहिजेत, असं ते म्हणाले आहेत. २०२६ च्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी न झाल्यानंतर बांगलादेशने भारताबरोबरचे द्विपक्षीय संबंध सुधारण्याबाबत मत व्यक्त केलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

हुमायूं कबीर काय म्हणाले?

“आम्हाला नवीन संबंधांच्या दिशेने वाटचाल करायची आहे. हे काम बहुपक्षीय मंचाऐवजी द्विपक्षीय चर्चेद्वारे केलं जावं. भारताबरोबरच्या ‘अति-केंद्रित’ दृष्टिकोनाच्या पलीकडे जाण्याची बांगलादेशला गरज आहे. नवी दिल्लीबरोबरच्या संबंधांकडे संतुलित दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे आणि परस्पर हितांना प्राधान्य दिलं पाहिजे. नवी दिल्लीसोबतचे संबंध हा बांगलादेशच्या इतर देशांशी असलेल्या व्यापक संबंधांचाच एक भाग आहे. भारत हा केवळ एक देश आहे आणि बांगलादेशाला त्याच्याशी चांगले द्विपक्षीय संबंध हवे आहेत”, असं हुमायूं कबीर यांनी म्हटलं आहे.

भारत-बांगलादेशात तणाव का निर्माण झाला?

दरम्यान, बांगलादेशात ऑगस्ट २०२४ मध्ये तरुणांच्या नेतृत्वाखाली मोठं आंदोलन झालं होतं. त्या आंदोलनानंतर शेख हसीना यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हापासून शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतलेला आहे. शेख हसीना यांना नवी दिल्लीने आश्रय दिल्यामुळे भारत-बांगलादेश संबंधांत तणाव निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. मात्र, आता बांगलादेशने भारतासोबतचे संबंध ‘नव्याने सुरू’ करायचे आहेत आणि परस्पर हितावर आधारित नवीन द्विपक्षीय संबंध प्रस्थापित करायचे आहेत अशी भूमिका मांडली आहे.