Bangladesh Violence Khaleda Zia First Reaction : बांगलादेशमध्ये राष्ट्रव्यापी हिंसा, तोडफोड, जाळपोळ आणि सरकारी मालमत्तेची लूट चालू आहे. हे पाहून बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या (बीएनपी) नेत्या खालिदा झिया यांनी चिंता व्यक्त केली आहे. बीएनपी नेत्यांनी याबाबत माहिती दिली आहे. बांगलादेशमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये काही ठराविक लोकांना आरक्षण देण्याविरोधात गेल्या महिनाभरापासून विद्यार्थी व तरुणांचं आंदोलन चालू आहे. शनिवारी हे आंदोलन अधिक तीव्र होऊन त्याला हिंसक वळण लागलं. या हिंसाचारात १५० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. काही स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दावा केला आहे की या हिंसाचारात ३५० हून अधिक लोक मारले गेले आहेत. दरम्यान, हे आंदोलन चिघळल्यानंतर शेख हसीना यांनी सोमवारी (५ ऑगस्ट) बांगलादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देत देशाबाहेर पलायन केलं.
दरम्यान, शेख हसीना यांनी पलायन केल्यानंतर बांगलादेशी लष्कराने देशाची सूत्रं हाती घेतली आहेत. पाठोपाठ बांगलादेशच्या माजी पंतप्रधान व शेख हसीना यांच्या कट्टर प्रतिस्पर्धी खलिदा झिया हा नजरकैदेतून मुक्त झाल्या आहेत. बांगलादेशचे अध्यक्ष शाहबुद्दीन अहमद यांनी मंगळवारी (६ ऑगस्ट) माजी पंतप्रधान खलिदा झिया यांच्या सुटकेची घोषणा केली. भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली त्यांना तुरुंगवास झाला होता. त्यानंतर त्या नजरकैदेत होत्या. नजरकैदेतून मुक्त झाल्यानंतर त्या उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. दरम्यान, खिलाफत मजलिसचे सरचिटणीस मौलाना मामुनुल हक यांनी रुग्णालयात जाऊन खलिदा झिया यांची भेट घेतली. या भेटीवेळी खलिदा झिया म्हणाल्या, “आपल्या देशाची संसाधनं नष्ट होत आहेत. आपल्याला आपला देश घडवायचा आहे. जे घडतंय ते देशासाठी चांगलं नाही”
खलिदा झिया म्हणाल्या, देशात चालू असलेली जीवित व वित्तहानी थांबायला हवी. देशाच्या संपत्तीचं, संसाधनांचं नुकसान होणं गंभीर आहे. आपल्या संसाधनांची लूट चालू आहे. ते थांबायला हवं. खिलाफत मजलिसचे संयुक्त सरचिटणीस मौलाना अताउल्लाह अमीन म्हणाले, बेगम खलिदा झियांवर अत्याचार झाला आहे. आम्ही बराच काळ तुरुंगात राहिलो. मौलाना ममुनुल हक हे देखील आमच्याबरोबर बराच काळ तुरुंगात होते. आम्ही तुरुंगात खलिदा बेगम यांच्या काळजी घ्यायचो. आता त्या पुन्हा देशसेवेसाठी सक्रीय होतील.
हे ही वाचा >> Sheikh Hasina Asylum : ब्रिटन आणि अमेरिकेने शेख हसीनांचा आश्रय नाकारला? पुढे काय? मुलगा सजीब वाझेद म्हणाले…
कोण आहेत खलिदा झिया?
खलिदा झिया (७८) या बांगलादेश नॅशनल पार्टीच्या संस्थापक आणि प्रमुख आहेत. त्यांनी याआधी अनेकवेळा बांगलादेशचं पंतप्रधानपद सांभाळले आहे. १९९१ साली पहिल्यांदा सत्तेवर आलेल्या खलेदा झिया या बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरल्या होत्या.
© IE Online Media Services (P) Ltd