Taslima Nasreen in India: अवघ्या महिन्याभरापूर्वी बांगलादेशमध्ये निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेची जगभरात चर्चा झाली. शेख हसीना यांना राजीनामा देऊन देशाबाहेर जावं लागलं. लष्करानं सूत्र हाती घेतली आणि नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांना हंगामी पंतप्रधान केलं. त्याचवेळी बांगलादेशमधील अल्पसंख्यकांच्या सुरक्षेचा मुद्दाही चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर भारतात गेल्या २० वर्षांपासून वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी लेखिका तसलिमा नसरीन यांच्या येथील वास्तव्याबाबत मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. आज तकला दिलेल्या मुलाखतीत तसलिमा नसरीन यांनी याबाबत मोठं विधान केलं आहे.
तसलिमा नसरीन यांना १९९४ साली राजकीय व स्थानिक विरोधामुळे बांगलादेश सोडावा लागला. बांगलादेशमध्ये त्यांच्या लेखनाविरोधातील असंतोषाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याविरोधात फतवा जारी करण्यात आला होता. बांगलादेशातून त्या युरोपमध्ये गेल्या. स्वीडनमध्ये त्यांनी काही वर्षं वास्तव्य केलं. त्यानंतर त्या भारतात आल्या आणि इथेच स्थायिक झाल्या.
सुरुवातीची चार वर्षं म्हणजेच २००४ ते २००७ या काळात त्या कोलकाता येथे राहिल्या. मात्र, त्यांच्या ‘द्विखंडितो’ या पुस्तकावर पश्चिम बंगाल सरकारनं बंदी आणली. तत्कालीन डाव्या सरकारच्या दबावामुळे त्यांना कोलकाता सोडावं लागलं. काही काळ जयपूरमध्ये वास्तव्य केल्यानंतर त्यांनी दिल्लीला मुक्काम हलवला. २०११ पासून तसलिमा नसरीन दिल्लीत वास्तव्यास आहेत. दरवर्षी त्यांना त्यांचा वास्तव्याच्या परवान्याचं नुतनीकरण करावं लागतं.
तसलिमा नसरीन यांची भीती
दरम्यान, जुलै महिन्यातच त्यांच्या वास्तव्याच्या परवान्याची मुदत संपुष्टात आली आहे. मात्र, त्यासंदर्भातल्या सरकारी संकेतस्थळावर त्यांच्या अर्जाबाबत कोणतीही कार्यवाही होताना दिसत नसल्यामुळे त्यांच्या चिंतेत भर पडली आहे. “मला भारतात राहायला आवडतं. पण आता जवळपास दीड महिना उलटला असून माझ्या वास्तव्याच्या परवान्याचं अद्याप नुतनीकरण करण्यात आलेलं नाही”, असं नसरिन यांनी आज तकला सांगितलं.
“मी यासंदर्भात कुणाशीही बोलत नाहीये. मी फक्त संकेतस्थळावर माझ्या अर्जाबाबत काय कार्यवाही झाली, एवढंच तपासू शकते. अजूनही माझ्या अर्जाबाबत संकेतस्थळावर ‘अपडेटिंग’ अशीच माहिती येत आहे. हे याआधी कधीच झालं नाही. प्रशासकीय स्तरावरूनही यासंदर्भात कोणताही प्रतिसाद येत नसून गृह मंत्रालयात नेमकं कुणाशी यासंदर्भात बोलायला हवं, याचीही मला कल्पना नाही”, असंही त्या म्हणाल्या.
“बांगलादेशच्या राजकारणाशी संबंध नाही”
दरम्यान, आपला बांगलादेशशी किंवा तिथल्या राजकारणाशी काहीही संबंध नसल्याचं त्या सांगतात. “मी भारतात स्वीडनची नागरिक म्हणून वास्तव्य करते आहे. माझा परवाना बांगलादेशमधील सध्याची स्थिती निर्माण होण्याच्याही आधी संपुष्टात आला आहे. लोकांना वाटतं की माझे बांगलादेश सरकारशी किंवा तिथल्या राजकारण्यांशी लागेबांधे आहेत. पण हे सत्य नाही. जर मला इथे वास्तव्याचा परवाना मिळाला नाही, तर मी नक्की मरेन. कारण आता मी इतर कुठेही जाण्याच्या स्थितीत नाही”, अशा शब्दांत तसलिमा नसरीन यांनी त्यांची परिस्थिती विषद केली.
तसलिमा नसरीन बांगलादेशमधून त्यांना बाहेर काढलं जाण्यासाठी शेख हसीना व खलिदा झिया या दोघींना जबाबदार मानतात. “त्या दोघींनी मला बांगलादेशात राहू दिलं नाही. त्यांनी इस्लामिक कट्टरतावादाला तिथे खतपाणी घातलं”, असा आरोपही तसलिमा नसरीन यांनी केला.