Bangladesh Hindu Man Lynching: बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा अराजकसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. १२ डिसेंबर रोजी विद्यार्थी नेता शरीफ उस्मान हादी याची हत्या केल्यानंतर ठिकठिकाणी हिंसाचार उसळला आहे. त्यानंतर ईशनिंदेचा आरोप करत एका हिंदू युवकाची जमावाने अतिशय निर्घृण हत्या केली. दीपू चंद्र दास नावाच्या कामगाराला जमावाने मारहाण करत झाडाला बांधून जाळून टाकले. यानंतर आता बांगलादेशमधील हंगामी सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने शुक्रवारी म्हटले, “नव्या बांगलादेशमध्ये अशाप्रकारच्या कोणत्याही हिंसाचाराला स्थान नाही. तसेच या गुन्ह्यात सामील असलेल्या कुणालाही सोडले जाणार नाही.” सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की, हिंदू युवकावर केलेला हल्ला आणि त्याच्या हत्येनंतर आम्हाला तीव्र दुःख होत आहे. या हल्ल्यामागे असलेल्या गुन्हेगारांना सोडले जाणार नाही.

हत्या झालेला हिंदू युवक दीपू चंद्र दास हा भालुका उपजिल्ह्यातील दुबालिया पारा भागात भाडेकरू म्हणून राहत होत. एका कपड्याच्या कारखान्यात तो कामगार म्हणून काम करायचा. स्थानिक लोकांनी त्याच्यावर ईशनिंदेचा आरोप करत गुरुवारी रात्री ९ वाजता हल्ला केला. यात त्याची अतिशय क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली.

अंतरिम सरकारचे माध्यम सचिव शफिकुल आलम यांनी फेसबुकवर सरकारने निवेदन बंगाली भाषेत पोस्ट केले आहे. यात त्यांनी बांगलादेशच्या लोकांना आवाहन करताना म्हटले की, काही अतिरेकी गटांकडून जाणीवपूर्वक हिंसाचार पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी अशाप्रकारच्या हिंसेपासून सावध राहावे. सरकार हिंसाचार, जाळपोळ, दहशत पसरविण्याच्या कृत्याचा स्पष्ट शब्दांत निषेध करत आहे.

विद्यार्थी नेता शरीफ उस्मान हादी याला शहीद दर्जा देत असताना अंतरिम सरकारने नागरिकांना हिंसाचार, चिथावणी आणि द्वेषापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. त्याचप्रकारे द डेली स्टार, प्रथम आलो आणि न्यू एज या माध्यमांच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याचाही निषेध केला आहे. या कार्यालयातील पत्रकार आणि कर्मचारी हल्ल्यातून थोडक्यात बचावले.

अंतरिम सरकारने पुढे म्हटले, “आम्ही तुमच्याबरोबर उभे आहोत. तुम्हाला दहशत आणि हिंसाचाराचा सामना करावा लागला, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. या दहशतीच्या वातावरणातही तुम्ही जे धैर्य दाखवले, त्याबद्दल हा देश आभारी आहे. पत्रकारांवर झालेला हल्ला हा सत्यावर झालेला हल्ला आहे. तुम्हाला पूर्ण न्याय मिळेल, याची खात्री देतो.”