Bangladesh : काही वर्षांपूर्वी ‘रन’ नावाचा एक बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात एक व्यक्ती त्याच्या मित्राला भेटण्यासाठी दिल्ली येतो आणि काही लोक त्याला बेशुद्ध करून त्याची किडणी काढून घेतात, असाच काहीसा प्रकार आता प्रत्यक्षात पुढे आला आहे. नोकरीच्या शोधात बांगलादेशातून भारतात आलेल्या तिघांची किडणी काढून घेण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या तिघांनी त्यांचा भयानक अनुभव सांगितला आहे. याप्रकरणी भारतात गुन्हा दाखल झाल्याचीही माहिती आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, या तिघांनी त्यांची आपबीती सांगितली आहे. “मी काही दिवसांपूर्वी कपड्याचा व्यवसाय करण्यासाठी आठ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, कपड्याच्या दुकानाला आग लागल्याने माझं आर्थिक नुकसान झालं. मी कसं तरी ३ लाख रुपये कर्ज फेडलं. मात्र, उर्वरित पाच लाख रुपयांच्या कर्जामुळे माझं कुटुंब आर्थिक अडचणी सापडलं. त्यामुळे मला नोकरी शोधणं भाग पडलं. एका मित्राने मला भारतात येऊन नोकरी करण्याचा सल्ला दिला आणि नोकरी शोधण्यास मदत करणार असल्याचे आश्वासन दिलं. त्यानुसार मी १ जून रोजी भारतात दाखल झालो. त्यानंतर काही लोक मला भेटायला आले. त्यांनी मला पैशांसाठी किडणी दान करण्यास सांगितले. पण मी नकार दिल्याने त्यांनी माझा पासपोर्ट आणि व्हिझा जप्त केला. अखेर त्यांनी माझी किडणी काढून घेतली आणि माझ्या खात्यात ४ लाख रुपये जमा करण्यात आले”, असं एका पीडित व्यक्तीने सांगितले आहे.

हेही वाचा- बांगलादेशातील अस्थिरता भारतीय वस्त्रोद्योगाच्या पथ्यावर ? जाणून घ्या, जागतिक बाजारातील, देशातील स्थिती

अन्य एका ३५ वर्षीय व्यक्तीने सांगितले, की “बांगलादेशमधील तस्कीन नावाच्या व्यक्तीने मला भारतात नोकरी मिळवून देण्याचं आश्वासन दिलं. त्यांच्यावर विश्वास ठेवत मी २ फेब्रुवारी रोजी भारतात दाखल झालो. दिल्ली विमानतळावर रसेल आणि मोहम्मद रोकोन नावाचे दोन व्यक्ती मला घ्यायला आले. त्यांनी मला हॉटेल रामपाल येथे नेलं. मला दवाखान्यात नोकरी मिळवून देतो, असं सांगितले. तसेच त्यासाठी वैद्यकीय तपासणी आवश्यक असल्याचंही मला सांगण्यात आलं. त्यांनी माझ्या १५ ते २० वैद्यकीय तपासण्या केल्या. पुढे २ एप्रिल रोजी मला एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे एका नर्सने मला इंजेक्शन देऊन बेशुद्ध केलं. तीन तारखेला पुन्हा मला इंजेक्शन देण्यात आलं. त्यानंतर मला थेट ५ एप्रिल रोजी शुद्ध आली, तेव्हा माझ्या पोटावर टाके दिसले. माझी शस्रक्रिया झाल्याचं सांगण्यात आलं. या दरम्यान माझा व्हिसा संपला होता. त्यामुळे मला नोकरी मिळणार नाही, असं सांगून ४ लाख रुपये देण्यात आले आणि मला परत बांगलादेशमध्ये पाठवण्यात आलं.”

याशिवाय आणखी एका व्यक्तीने सांगितले, की “काही दिवसांपूर्वी एरॉन नावाच्या व्यक्तीने मला फेसबुकवर संपर्क केला होता. त्या व्यक्तीने मला भारतात नोकरी देण्याचं आमिष दिलं. त्या आमिषाला बळी पडत मी भारतात दाखल झालो. मला नोकरीसाठी वैद्यकीय चाचणी करण्यास सांगण्यात आलं. मात्र, यादरम्यान माझ्या शरीरातून अतिरिक्त प्रमाणात रक्त काढण्यात आलं. त्यामुळे मी बेशुद्ध झालो. मी शुद्धीवर आल्यानंतर माझी किडणी काढण्यात आली असून मी एका किडणीवरही जगू शकतो, असं सांगण्यात आलं आणि मला ४.५ लाख रुपये देण्यात आले.”

दरम्यान, वरील तिन्ही व्यक्ती आता बांगलादेशमध्ये दाखल झाले असून याप्रकरणी भारतात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.