Bangladesh MP Expresses Concern over Illegal Migrant Deportation: पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या हातातू सत्ता जाणार असल्याचा अंदाज बहुतेक एक्झिट पोलनी वर्तवल्यानंतर आता पश्चिम बंगालच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. फक्त भारतच नाही तर शेजारी असलेल्या बांगलादेशमध्येही या निकालाची चर्चा आहे. ४ मे रोजी पश्चिम बंगालसह चार राज्यांचा निकाल लागेल. तत्पूर्वी बांगलादेशच्या संसदेत एक्झिट पोलच्या अंदाजावर चिंता व्यक्त करण्यात आली. तिथल्या संसदेत नेमके काय घडले? खासदारांनी कोणती चिंता व्यक्त केली, हे पाहू.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभेसाठी २३ एप्रिल आणि २९ एप्रिल रोजी दोन टप्प्यात मतदान संपन्न झाले. निवडणुकीचा निकाल ४ मे रोजी जाहीर होणार आहे. पश्चिम बंगाल विधानसभेत एकूण २९४ जागा असून बहुमताची संख्या १४८ इतकी आहे. २०२१ च्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने २१३ जागा मिळवून स्पष्ट बहुमत मिळवले होते. तर भाजपाला ७७ जागांवर विजय मिळाला होता. बुधवारी जाहीर झालेल्या एक्झिट पोलनुसार भाजपाला विजय मिळेल असा अंदाज वर्तवला गेला.
बांगलादेशच्या संसदेत काय चर्चा झाली?
बांगलादेशच्या संसदेत बोलत असताना एनसीपी पक्षाचे खासदार अख्तर हुसेन यांनी एक्झिट पोलच्या अंदाजावर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा विजय झाल्यास लाखो बेकायदेशीर स्थलांतरितांना देशात पाठविण्याची कारवाई सुरू होऊ शकते.
“पश्चिम बंगालमध्ये भाजपाची सत्ता येऊ शकते, असा अंदाज एक्झिट पोल्सनी वर्तवला आहे. याप्रमाणे तिथे खरंच भाजपाची सत्ता आली तर ते बांगलादेशी स्थलांतरितांना पुन्हा बांगलादेशमध्ये ढकलतील. यामुळे इथे मोठा गोंधळ उडू शकतो आणि आपल्या समोर स्थलांतरितांचे संकट उभे राहू शकते. आपल्याला यावर गंभीर विचार करायला हवा”, अशी भीती खासदार हुसेन यांनी व्यक्त केली.

खासदार हुसेन पुढे म्हणाले, भाजपाचा सत्ता तिथे आल्यास बांगलादेशमध्ये स्थलांतरितांचा महापूर येऊ शकतो. भारतातून मुस्लीम स्थलांतरितांना परत पाठवले जाणार नाही, याची कोणतीही हमी नाही. अशावेळी आपल्याला एकसंध राहण्याची गरज आहे.
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांची टीका
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी खासदार हुसेन यांचा हा व्हिडीओ त्यांच्या एक्स हँडलवर शेअर केला आहे. व्हिडीओसह लिहिलेल्या कॅप्शनमध्ये त्यांनी तृणमूल काँग्रेस पक्षावर टीका केली. बांगलादेशचे मदतनीस हळूहळू समोर येत आहेत, अशी टीका दुबे यांनी केला.
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे सरकार आल्यास ते अवैध घुसखोरांना थांबवतील, तसेच राज्यात असलेल्या बांगलादेशी घुसखोरांना येण्यापासून रोखतील, अशी भीती तेथील खासदार व्यक्त करत आहेत. खासदार हुसेन यांनी बांगलादेशच्या संसदेत यासंबंधी चिंता व्यक्त केली. तृणमूल काँग्रेसचे मदतनीस यामुळे आता पुढे येत आहेत.
‘SIR’ मोहीम आणि घुसखोरीचा मुद्दा गाजला
पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचारात ‘SIR’ आणि घुसखोरीचा मुद्दा चांगलाच गाजला. निवडणूक आयोगाने राबवलेली मतदारांची विशेष फेरतपासणी मोहीम निवडणुकीतील वादाचा सर्वात मोठा केंद्रबिंदू ठरली. या मोहिमेअंतर्गत मतदार यादीतून तब्बल ९० लाख मतदारांची नावे वगळण्यात आली, ज्यामुळे एकूण मतदारांची संख्या ७.६६ कोटींवरून ६.७५ कोटी इतकी झाली. यादरम्यान निवडणूक आयोगाची ही मोहीम आपल्या समर्थकांना मतदानापासून वंचित ठेवण्याचे एक कारस्थान असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला. भाजपाने मात्र या मोहिमेचे समर्थक करून राज्यातील घुसखोरीचा मुद्दा उचलून धरला. सीमावर्ती जिल्ह्यांमधील बेकायदेशीर स्थलांतरित आणि बोगस मतदारांना बाहेर काढण्यासाठी ही स्वच्छता मोहीम आवश्यक असल्याचे भाजपाने म्हटले.
पश्चिम बंगालमध्ये मतदान वाढले
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत दोन्ही टप्प्यात मिळून ९२.४७ टक्के मतदान झाले. स्वातंत्र्यानंतरचा हा विक्रम आहे. बुधवारी (२९ एप्रिल) दुसर्या टप्प्यात ९१.६६ टक्के मतदान झाले. अर्थात ही आकडेवारी अंतिम नव्हती. पहिल्या टप्प्यात ९३.१९ टक्के मतदान झाले होते. यापूर्वी २०११ मध्ये सर्वाधिक ८४.७२ टक्के मतदान झाले होते. यावेळी महिलांच्या मतदानाची टक्केवारी ९३.२४ इतकी होती तर ९१.७४ टक्के पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. विधानसभेच्या राज्यातील एकूण २९४ जागांपैकी दुसर्या टप्प्यात १४२ जागा होत्या.
