राजस्थानमधील जयपूर पोलिसांनी बांगलादेशातील तीन नागरिकांना अटक केली असून, त्यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. या महिलेने भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश करून आपली खरी ओळख लपवून हिंदू महिला असल्याचे भासवत राजस्थानातील एका तरुणाशी विवाह केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. या प्रकरणामागे बेकायदेशीर घुसखोरी आणि बनावट कागदपत्रांच्या मोठ्या रॅकेटचा संबंध आहे का, याचाही तपास सुरू आहे. याबद्दल सविस्तर वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.
हिंदू महिला असल्याचा आव आणल्याचा आरोप
पोलिसांच्या माहितीनुसार, रुबिया नावाच्या महिलेने सिंदूर लावणे आणि मंगळसूत्र घालणे अशा हिंदू विवाहित महिलांच्या प्रथा पाळून स्वतःची ओळख लपवली. संशय टाळण्यासाठी तिने राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील एका तरुणाशी प्रेमविवाह केल्याचा आरोप आहे.
जयपूरच्या वेगवेगळ्या भागांतून तिघांना अटक
वरिष्ठ पोलीस अधिकारी राजर्षी राज यांनी सांगितले की, रुबियाला नारायण विहार परिसरातून, नदिमला मानसरोवरमधून आणि आशिष हलदारला सांगानेर सदर परिसरातून अटक करण्यात आली. प्राथमिक चौकशीत तिघांनीही अनेक वर्षांपूर्वी बांगलादेशातून भारतात बेकायदेशीररीत्या प्रवेश केल्याची कबुली दिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. रुबियाने उपचाराच्या बहाण्याने भारतात आल्याचे सांगितले, तर दोन्ही पुरुषांनी रोजगाराच्या शोधात भारतात आल्याचे म्हटले.
पासपोर्ट जप्त
तपासादरम्यान पोलिसांनी रुबियाकडून बांगलादेशी पासपोर्ट जप्त केला. मात्र, त्यावर भारतात कायदेशीर प्रवेश किंवा इमिग्रेशनची कोणतीही अधिकृत नोंद आढळली नाही. तिच्याकडून मिळालेले आधार कार्ड बनावट असल्याचा संशय असून ते कोणी तयार केले आणि कसे मिळवले, याचा तपास सुरू आहे.
राजस्थानभरातील प्रकरणांशी संबंध?
पोलीस सूत्रांनुसार तपासात जयपूर, नागौर, भिलवाडा आणि अजमेर येथे अटक झालेल्या काही बांगलादेशी महिलांमध्ये परस्पर संबंध असल्याचे समोर आले आहे. या महिलांनी आपली खरी ओळख लपवून राजस्थानातील हिंदू पुरुषांशी विवाह केल्याचा संशय पोलिसांना आहे. तसेच काही महिलांना वेश्याव्यवसायाशी संबंधित रॅकेटमार्फत भारतात आणण्यात आले होते का, याचाही तपास सुरू आहे.
मोठ्या नेटवर्कचा शोध सुरू
सध्या तरी अटक करण्यात आलेल्या आरोपींचा देशविरोधी कारवायांशी किंवा कोणत्याही संघटनेशी संबंध असल्याचे कोणतेही पुरावे पोलिसांना मिळालेले नाहीत. हे प्रकरण केवळ बेकायदेशीर घुसखोरी आणि बनावट कागदपत्रांपुरते मर्यादित आहे की त्यामागे मोठे संघटित जाळे आहे याचा तपास सुरू असून पुढील चौकशीत माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
