२०१८मध्ये देशाची राजधानी दिल्लीमध्ये एकाच कुटुंबातल्या ११ जणांनी आत्महत्या केल्याच्या प्रकारामुळे खळबळ उडाली होती. तसाच काहीसा प्रकार बंगळुरमध्ये घडला असून एकाच कुटुंबातल्या पाच जणांनी आत्महत्या केल्याचं उघड झाल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. त्याचवेळी घरातल्या एका ९ महिन्यांच्या चिमुकल्याचा भुकेनं तडफडून मृत्यू झाल्याचा प्रकार पोलिसांना निदर्शनास आला असून एक अडीच वर्षांची मुलगी वाचली आहे. घरातीलच एक सदस्य काही दिवसांनी बाहेरगावाहून घरी परतल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊ या प्रकरणाचा तपशील घेतला असून त्याविषयी पुढील तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती (५४), सिंचना (३४), सिंधुराणी (३१) आणि मधूसागर (२५) अशी मृतांची नावं आहेत. या सगळ्यांचे मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्याचसोबत एका ९ महिन्यांच्या चिमुकल्याचा मृतदेह पलंगावर आढळून आला. विशेष म्हणजे या सगळ्या प्रकारात एक अडीच वर्षांची मुलगी मात्र वाचली आहे. या मुलीला तातडीने तपासणी आणि उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

नेमकं घडलं काय?

हा सगळा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. घरातील एक सदस्य हलेगिरी शंकर हे बाहेरगावाहून चार ते पाच दिवसांनंतर घरी परतले, तेव्हा घर आतून बंद होतं. अनेकदा वाजवूनही कुणीच घर उघडलं नाही तेव्हा पोलिसांना पाचारण करण्यात आलं. यावेली पोलिसांनी घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. तेव्हा त्यांना चार जणांचे मृतदेह घराच्या वेगवेगळ्या खोल्यांमध्ये छताला लटकलेल्या अवस्थेत दिसून आले. त्याचवेळी ९ महिन्यांच्या चिमुकल्याचा मृतदेह पलंगावर होता, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. अडीच वर्षांची मुलगी या प्रकारात जिवंत वाचली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. यापैकी भारती या शंकर यांच्या पत्नी आहेत. इतर तिघेजण त्यांची मुलं असून दोघे चिमुरडे त्यांचे नात-नातू आहेत.

दिल्लीतील ‘ती’ थरकाप उडवणारी घटना!

याच प्रकारची एक घटना २०१८मध्ये राजधानी दिल्लीमध्ये घडली. यामध्ये एकाच कुटुंबातल्या ११ जणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. मात्र, कालांतराने तपासामधून अघोरी कृत्यामध्ये या सगळ्यांचा जीव गेल्याचं स्पष्ट झालं होतं. दिल्लीच्या बुरारी भागामध्ये हा प्रकार घडला होता. यात कुटुंबातल्या १० जणांनी घरातल्या छताला गळफास घेतला होता, तर एका महिलेचा मृतदेह दुसऱ्या खोलीत जमिनीवर सापडला होता. मृत्यूनंतर देखील पुन्हा जिवंत होण्याच्या अंधश्रद्धेपायी त्यांचा जीव गेल्याचं तपासातून समोर आलं होतं.