डेबिट कार्ड वापरुन ATM मधून पैसे काढणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. १ जुलैपासून ATM मधून पैसे काढण्याचे नियम बदलणार आहेत. करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन एप्रिल, मे, जून हे तीन महिने काही नियम शिथील करण्यात आले होते. मात्र १ जुलैपासून हे नियम लागू होणार आहेत. त्यामुळे १ जुलैपासून तुमचं एटीएममधून पैसे काढणं महाग होण्याची शक्यता आहे.

अर्थमंत्रालयाने करोना काळात ATM मधून पैसे काढण्याच्या शुल्कावर सूट दिली होती. एप्रिल, मे, जून हे तीन महिने ही सूट होती. त्यामुळे मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र आता ३० जूनला ही सूट संपते आहे. त्यामुळे पूर्वीचे जे नियम होते तेच १ जुलैपासून लागू होणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने इतर बँकेच्या ATM मधून पैसे काढण्यावरच्या चार्जेसचा समावेश आहे. त्यामुळे आता ग्राहकांना आपल्या बँकेच्या ATM मधूनच पैसे काढणं सोयीचं ठरणार आहे. उदा. तुमचं अकाऊंट HDFC बँकेत आहे आणि तुम्ही एसबीआय किंवा इतर बँकेतून पैसे काढले तर तो व्यवहार सशुल्क असू शकतो.

आणखी वाचा- आंतरराष्ट्रीय विमानसेवेसंबंधी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

मिळालेल्या माहितीनुसार स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात SBI ने प्रमुख शहरांमध्ये महिन्याभरात आठवेळा पैसे काढण्याची मुभा दिली आहे. त्यानंतरच्या प्रत्येक एटीएम व्यवहारासाठी शुल्क आकारले जाईल. SBI ने जे आठ व्यवहार मोफत ठेवले आहेत त्यानुसार तुम्ही आठपैकी ५ वेळा SBI च्या एटीएममधून पैसे काढू शकता तर तीनवेळा इतर कोणत्याही बँकेच्या एटीममधून पैसे काढू शकता. महानगरं नसलेल्या शहरांमध्ये हे प्रमाण १० व्यवहार असे एसबीआयने ठेवले आहे. ज्यामध्ये ५ वेळा SBI ATM आणि ५ वेळा दुसऱ्या कोणत्याही बँकेच्या एटीएमचा समावेश आहे. त्यानंतरच्या व्यवहारांसाठी साधारण २८ रुपये शुल्क लागण्याचीही शक्यता आहे. इंडिया टीव्हीने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. याचप्रमाणे इतर बँकाही त्यांच्या नियमांमध्ये बदल करु शकतात. ज्यामुळे एटीएममधून नेमून दिलेल्या व्यवहारांपेक्षा जास्त वेळा पैसे काढणं हे खर्चिक असू शकतं.