पारपत्र मिळवण्यासाठी अर्जदाराने निवासाचा पत्ता म्हणून सरकारी क्षेत्रातील बँकांचे खाते पुस्तक दिल्यास ते ग्राह्य़ धरले जाईल, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.
बँकेचे खाते पुस्तक वा बँक व्यवहाराचे निवेदन निवासाचा पुरावा म्हणून ग्राह्य़ धरण्यात येईल, असे प्रादेशिक पारपत्र अधिकारी सी सेंथिल पांडियन यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे. यापूर्वी पारपत्रासाठी परराष्ट्र मंत्रालयाने निवासाचा पत्ता म्हणून पाणी, दूरध्वनी तसेच विद्युत देयक ग्राह्य़ धरले होते. तसेच प्रादेशिक बँका वगळता इतर बँकेतील एक वर्षांच्या व्यवहारांची माहिती देणारे निवेदन ग्राह्य़ धरले जात होते. मात्र आता अलाहाबाद बँक, आंध्रा बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बॅक, सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, कॉपरेरेशन बँक, देना बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसिज बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अ‍ॅण्ड सिंध बँक; त्याशिवाय इतर बँकांमध्ये सिंडिकेट बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, युनायटेड बँक ऑफ इंडिया, यूसीओ बँक, विजया बँक, आयडीबीआय बँक आदी बँकांचाही समावेश आहे.