Bankipur Bypoll 2026 Results Prashant Kishor Neeraj Kumar Sinha: गेल्या ३० वर्षांपासून भाजपाचे वर्चेस्व असणाऱ्या बिहारमधील बांकीपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत जन सुराज पक्षाच्या प्रशांत किशोर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. प्रशांत किशोर यांच्यासह भाजपासाठी देखील महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. माजी आमदार आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची राज्यसभेवर निवड झाल्यानंतर रिक्त झालेला या जागेसाठी पोटनिवडणूक ३० जुलै रोजी मतदान झाले होते. भाजपाकडून येथे नीरज कुमार सिन्हा मैदानात होते. अखेरच्या ३२ व्या फेरीनंतर प्रशांत किशोर यांना ६४,१५१ मते मिळाली असून, १९,३२४ मतांनी त्यांनी विजय मिळवला आहे.

भाजपाला धक्का

प्रशांत किशोर यांचा विजय भाजपासाठी मोठी धक्का मानला जात आहे. भाजपाकडून येथे मैदानात असलेल्या नीरज कुमार सिन्हा यांना या निवडणुकीत ४४,८२७ मते मिळाली तर, आरजेडीच्या रेखा कुमारी यांना १४,२७३ मते मिळवत आली. नितीन नबीन यांच्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक झाली होती. गेल्या ३० वर्षांपासून बांकीपूर हक्काची जागा मानली जात होती. दरम्यान, प्रशांत किशोर यांनी याला छेद देत मोठा विजय मिळवला आहे.

Final Voting Turnout
Final Voting Turnout (फोटो – EC Website Screenshot)

२६ उमेदवार रिंगणात

बांकीपूर पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. मतमोजणीसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. ३६ फेऱ्यांनंतर मतमोजणी पूर्ण झाली आहे. ३० जुलै रोजी झालेल्या या पोटनिवडणुकीत ३४.३० टक्के मतदान झाले होते. यावेळी एकूण २६ उमेदवार रिंगणात होते.

पहिल्या फेरीपासून प्रशांत किशोर आघाडीवर

बांकीपूर पोटनिवडणुकीच्या मतमोजणीसाठी पटणा येथील मतमोजणी केंद्रावर सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. प्रशांत किशोर पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होते. मतमोजणीच्या पहिल्या फेरीअखेरीस जन सुराज पक्षाचे प्रशांत किशोर यांनी ८६२ मतांची आघाडी घेतली होती, भाजपाचे नीरज कुमार पिछाडीवर होते. तर, आरजेडीच्या रेखा कुमारींना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती.

प्रशांत किशोर यांची आघाडी कायम

बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीच्या २७ फेऱ्या पूर्ण झाल्यानंतरही प्रशांत किशोर आघाडीवर होते. २७ व्या फेरीनंतर त्यांना ५५,७८० मते मिळाली होती. कुमार भाजपा उमेदवाराच्या तुलनेत १६,८८७ मतांनी आघाडीवर होते. तर, भाजपा उमेदवार पिछाडीवर होते. प्रशांत किशोर यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी कायम राखली आहे.

विजयानंतर प्रशांत किशोर काय म्हणाले?

विजयानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रशांत किशोर यांनी राज्याला सक्षम मुख्यमंत्र्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. “बांकीपूर निवडणूक केवळ आमदार निवडण्यासाठी नव्हती. बिहारच्या जनतेने भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला स्पष्ट संदेश दिला आहे. बिहारच्या नेतृत्वाची धुरा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीकडे जाऊ नये, अशी जनतेची इच्छा आहे. राज्याला शिक्षण, रोजगार आणि विकासाला प्राधान्य देणारा सक्षम मुख्यमंत्री हवा आहे,” असे किशोर म्हणाले.