बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत जन सुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी भाजपचा बालेकिल्ला भेदत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी या निकालाचे राजकीय परिणाम आणि भविष्यातील समीकरणांवर सविस्तर भाष्य केले आहे.

भाजपचा बालेकिल्ला कोसळला

भाजपचे नितीन नबीन यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर बांकीपूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. १९९५ पासून या मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व राहिले होते. नितीन नबीन स्वतः सलग पाच वेळा येथून आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर त्यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे ही जागा रिक्त झाली.

हा मतदारसंघ कायम राखण्यासाठी भाजपने संपूर्ण ताकद पणाला लावली. मात्र, या निवडणुकीत जन सुराज पक्षाचे प्रशांत किशोर यांनी विजय मिळवत भाजपला मोठा धक्का दिला.

उच्चवर्णीय मतदारांमध्ये बदलाचे संकेत?

गिरीश कुबेर यांच्या विश्लेषणानुसार, २००८ नंतर अस्तित्वात आलेला बांकीपूर मतदारसंघ हा भाजपचा पारंपरिक उच्चवर्णीय मतदारांचा बालेकिल्ला मानला जातो. येथे मुस्लिम-यादव (M-Y) समीकरण प्रभावी नाही. तरीही या निवडणुकीत प्रशांत किशोर यांना सुमारे ४८ टक्के मते मिळाली, तर भाजपला केवळ ३० ते ३२ टक्के मतांवर समाधान मानावे लागले.

त्यांच्या मते, पारंपरिक हिंदू मतदार भाजपपासून दूर जात असल्याची पहिली चुणूक या निकालातून दिसत आहे. ‘Gen Z’ आंदोलनातील आंदोलकही प्रामुख्याने हिंदू होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

मुख्यमंत्री सम्राट चौधरींसाठी मोठा धक्का

कुबेर यांच्या मते, हा पराभव केवळ नितीन नबीन यांच्यासाठीच नव्हे, तर बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्यासाठी अधिक नामुष्कीचा आहे. “सम्राटाच्या मुकुटातील दागिना पहिल्याच वर्षी गळाला,” अशी परिस्थिती या निकालामुळे निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले.

विरोधकांसाठी महत्त्वाचा संदेश

मतदारांना एखाद्या बलाढ्य पक्षाचा पराभव शक्य असल्याचा विश्वास वाटू लागला, तर निवडणुकीची दिशा बदलू शकते, असे गिरीश कुबेर यांनी नमूद केले. आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी विरोधकांनी या निकालातून बोध घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रशांत किशोर ‘लंबी रेस का घोडा’ ठरतील?

या प्रश्नावर बोलताना गिरीश कुबेर म्हणाले की, बिहार ही महाराष्ट्रानंतर सर्वाधिक आमदार असलेली मोठी विधानसभा आहे. प्रशांत किशोर यांच्यावर विविध आरोप होत असताना त्यांना स्वतःची प्रतिमा आणि राजकीय अस्तित्व अधिक ठोसपणे सिद्ध करावे लागेल. त्यामुळे आताच त्यांना ‘लंबी रेस का घोडा’ ठरवणे घाईचे ठरेल.

मोदी-शाहांचा प्रभाव कमी होतोय?

बांकीपूरच्या एका निकालावरून केंद्रातील राजकीय वातावरण बदलत असल्याचा निष्कर्ष काढणे म्हणजे “सुतावरून स्वर्ग गाठण्यासारखे” ठरेल, असे कुबेर यांनी स्पष्ट केले. मात्र, याच प्रवृत्तीचा परिणाम आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत दिसला, तर त्याचे व्यापक राजकीय परिणाम स्पष्ट होतील. उत्तर प्रदेशात सुमारे २८ ते २९ टक्के मतदार निर्णायक भूमिका बजावतील, असेही त्यांनी नमूद केले.

उत्तर प्रदेशची निवडणूक ठरणार निर्णायक

गिरीश कुबेर यांच्या मते, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक भविष्यातील राष्ट्रीय राजकारणाची दिशा ठरवणारी ठरू शकते. सध्या भाजपला राज्यात अंतर्गत मतभेदांचा सामना करावा लागत असून, हे मतभेद पक्ष कशा प्रकारे हाताळतो, यावर पुढील राजकीय चित्र अवलंबून असेल.

देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाण्याची शक्यता?

देवेंद्र फडणवीस दिल्लीत जातील, असे वाटत नसल्याचे गिरीश कुबेर यांनी सांगितले. त्यांच्या मते, दिल्लीत गेल्यानंतर त्यांना सध्या ते जे काम करत आहेत, ते करण्याची संधी मर्यादित राहण्याची शक्यता आहे. कारण तिथे त्यांची सुरुवातच पाचव्या क्रमांकाच्या पदावरून होईल. इथले पहिले क्रमांकाचे पद सोडून ते दिल्लीत जातील, असे मला वाटत नाही, असे गिरीश कुबेर यांनी यावेळी म्हटले.