‘गॅलप’ या संस्थेच्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष; हिलरी क्लिंटन यांचीही आघाडी

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा आणि माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांना पुन्हा एकदा अमेरिकेतील नागरिकांनी सर्वाधिक पसंती दिली आहे, असा निष्कर्ष आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ‘गॅलप’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे.

गॅलपच्या सर्वेक्षणामध्ये ओबामा सलग १० व्या वेळेस यादीमध्ये आघाडीवर राहिले आहेत, तर हिलरी क्लिंटन सलग १६ व्या वर्षी सर्वात जास्त वेळा प्रशंसनीय महिला म्हणून सर्वेक्षणातून निवडण्यात आल्या आहेत.

गेल्या वर्षी झालेल्या अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हिलरी यांना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र असे असूनही त्यांनी या सर्वेक्षणामध्ये आघाडी घेतली आहे.

सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्या १७ टक्के लोकांनी ओबामांना आपली सर्वाधिक पसंती दर्शवली आहे. गेल्या वर्षी ओबामा यांना २२ टक्के मते मिळाली होती. या सर्वेक्षणात ट्रम्प १४ टक्के मतांसह दुसऱ्या स्थानावर आहेत, तर पोप फ्रान्सिस यांना या सर्वेक्षणात तिसरे स्थान मिळाले आहे.

मतदान करणाऱ्यांपैकी ९ टक्के लोकांनी हिलरी यांना सर्वाधिक प्रशंसनीय महिला म्हणून पसंती दिली आहे, तर यापूर्वीच्या देशाच्या पहिल्या महिला नागरिक मिशेल ओबामा ७ टक्के मतांसह दुसऱ्या आणि ४ टक्के मतांसह ओपरा विन्फ्रे तिसऱ्या स्थानावर आहेत. अमेरिकेच्या पहिल्या महिला नागरिक मेलानिया ट्रम्प यांना केवळ १ टक्के मते मिळाली आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांना व्हाइट हाऊसमध्ये येऊन १ वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच ओबामा यांना या सर्वेक्षणामध्ये सर्वाधिक प्रशंसनीय व्यक्ती म्हणून नागरिकांनी त्यांना मते दिली आहेत. सध्याचे अध्यक्ष देशाचे प्रमुख व्यक्ती असूनही ते सामान्य विजेते ठरले आहेत. मात्र अध्यक्षांना पसंती न देता इतर लोकांना नागरिकांनी आपली पसंती दर्शवली आहे, असे गॅलपने निवेदनामध्ये म्हटले आहे.

गॅलपने १९४६ पासून आतापर्यंत तब्बल ७१ वेळा असे सर्वेक्षण केले आहे. ५८ अध्यक्षांनी या सर्वेक्षणामध्ये सर्वाधिक पसंती मिळवली आहे. इतरांच्या तुलनेत हिलरी क्लिंटन या यादीत सर्वाधिक वेळा (२२) नागरिकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. या सर्वेक्षणामध्ये १ हजार ४९ लोकांनी सहभाग घेतला होता.