ब्राझीलमध्ये झिका विषाणूंचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात झाला असून, पश्चिम अर्धगोलार्धात त्याचे प्रमाण वाढत आहे. या पाश्र्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांच्या ब्राझीलमधील समपदस्थ दिलमा रोसेफ यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून चिंता व्यक्त केली.
झिका विषाणूंचा मुकाबला करण्यासाठी संयुक्त प्रयत्नांची गरज असून, प्रगत संशोधनातील निष्कर्षांची देवाणघेवाण गरजेची आहे, त्यामुळे लसी तयार करून विषाणूंचे नियंत्रण करणे शक्य आहे असे ओबामा यांनी रोसेफ यांना सांगितले.
राष्ट्रीय, प्रादेशिक व जागतिक पातळीवर या विषाणूंचा सामना करण्यासाठी यंत्रणा उभारणे गरजेचे आहे. यावर ओबामा व रोसेफ यांच्यात मतैक्य गरजेचे आहे, यावर दोन्ही नेत्यांमध्ये मतैक्य झाले.
अंतर्गत सुरक्षा व सरकारी कामकाज समितीचे सदस्य टॉम कार्पर व अध्यक्ष रॉन जॉन्सन यांनी अंतर्गत सुरक्षामंत्री जे जॉन्सन व रोगनियंत्रण संचालक थॉमस फ्रिडेन यांना पत्र पाठवून विषाणूंबाबत आणखी माहिती मागवली आहे. इबोलाप्रमाणेच झिका विषाणूविरोधात लढताना एकजूट दाखवली पाहिजे व समन्वय असला पाहिजे असे मत कार्पर यांनी व्यक्त केले आहे. या विषाणूंचा मातांना व नवजात बालकांना जास्त धोका असल्याने ती चिंतेची बाब आहे असे सांगण्यात येत आहे. गेल्या मे महिन्यापासून झिका विषाणूंचा प्रसार सुरू झाला असून, त्यामुळे ताप व इतर लक्षणे दिसतात. मध्य व दक्षिण अमेरिकी देशात त्याचा प्रसार वाढला आहे. ब्राझीलमध्ये झिका विषाणूंच्या प्रसारामुळे मेंदूची कमी वाढ झालेली मुले जन्माला आली आहेत.
बराक ओबामा