रशियाचा विरोध झुगारून सीरियावर मर्यादित लष्करी कारवाई करण्याचे अमेरिकेने जवळपास निश्चित केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी शुक्रवारी रात्री याबाबतचे संकेत दिले. सीरियाचे अध्यक्ष बाशर-अल-असाद यांनी विरोधकांचे आंदोलन चिरडण्यासाठी रासायनिक अस्त्रांचा वापर केल्याची खात्री पटल्याने अमेरिकेने ही कारवाई करण्याची पूर्वतयारी सुरू केली आहे.
सीरियावर कारवाई करण्याचा निर्णय आम्ही बदलला नाही. त्यांच्यावर लवकरच लष्करी कारवाई करण्याचा आमचा विचार आहे. मात्र, तेथे दीर्घकाळासाठी तळ ठोकण्याचा आमचा विचार नाही, अतिशय मर्यादित स्वरूपाची ती कारवाई असेल, याबाबत आम्ही आमच्या लोकप्रतिनिधींशी आणि मित्र राष्ट्रांशी चर्चा केली आहे, असे ओबामा यांनी पत्रकारांना सांगितले. दरम्यान, ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी ओबामा यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. यापुढेही आंतरराष्ट्रीय मुद्दय़ांवर आपले सहमतीचे धोरण कायम राहील, असे कॅमेरॉन यांनी ओबामांना सांगितले.  
सीरियाच्या अध्यक्षपदी गेली चार दशके ठाण मांडून बसलेल्या बाशर यांच्याविरोधात प्रचंड असंतोष आहे. त्यांच्या विरोधकांनी देशाच्या साठ टक्के भागाचा कब्जा केला असून राजधानी दमास्कसमध्येही या बंडखोरांचे प्राबल्य आहे. हे आंदोलन चिरडण्यासाठी २१ ऑगस्ट या दिवशी बंडखोरांच्या वसाहतींवर रासायनिक अस्त्रांचा मारा करण्यात आला होता, यात सुमारे पंधराशे नागरिक मृत्युमुखी पडले होते, यात लहान मुलांचाही समावेश होता. जगभरातून या घटनेची निंदा करण्यात आली. रासायनिक अस्त्रांचा वापर करणे, हे संयुक्त राष्ट्राच्या कायद्याचा भंग असल्याने अमेरिकेने सीरियावर लष्करी हल्ला करण्याची घोषणा केली होती, मात्र ब्रिटनचा अपवाद वगळता अन्य युरोपीय देशांनी अमेरिकेच्या या निर्णयाबाबत फारशी उत्सुकता न दाखविल्याने हा हल्ला लांबणीवर पडला.
रशिया व संयुक्त राष्ट्रांना धुडकावून सीरियावर हल्ला करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांची परवानगी मागण्यात येणार नाही, असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी सांगितले. संयुक्त राष्ट्रांची परवानगी मागितल्यास रशिया त्यास जोरदार विरोध करेल, त्यामुळे आम्ही परस्पर ही कारवाई करणार आहोत. दमास्कसमध्ये झालेल्या हल्ल्यात रासायनिक अस्त्रांचा वापर करण्यात आला होता आणि त्यामागे बाशर यांचाच हात होता, हे आम्हाला खात्रीलायकरीत्या समजले आहे, त्यामुळे कोणाची संमती घेण्याची गरज नाही, असे ते म्हणाले.
 रशियाने मात्र याबाबत ताठर भूमिका घेतली असून अमेरिकेने अशी परस्पर कारवाई केल्यास तो आंतरराष्ट्रीय कायदा व संयुक्त राष्ट्रांच्या कायद्याचा भंग होईल, असे ठणकावले आहे. चीननेही सीरियाला पाठिंबा दिला आहे.

सीरियावरी आरोप बिनबुडाचा -पुतिन
एएफपी, मॉस्को : सीरियाने रासायनिक शस्त्रांचा वापर केल्याचा करण्यात आलेला दावा बिनबुडाचा असल्याचे रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी म्हटले आहे. सीरियाच्या सैन्याने विविध प्रांतांत विरोधकांना घेरले असून ते आक्रमक आहेत आणि या स्थितीत लष्करी हस्तक्षेपाचे आवाहन करणाऱ्यांच्या हातात हुकमाचा पत्ता सोपविणे मूर्खपणाचे आहे, असे पुतिन यांनी वार्ताहरांना सांगितले.