अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा हे गेल्या अर्धशतकाच्या वितुष्टानंतर क्युबात दाखल झाले असून ते त्यांचे समपदस्थ रौल कॅस्ट्रो यांच्याशी चर्चा करणार आहेत. २००८ मध्ये फिडेल कॅस्ट्रो यांनी क्युबाची सत्ता त्यांचे बंधू रौल कॅस्ट्रो यांच्याकडे सोपवली होती. क्युबाची राजधानी हवाना येथे ओबामा व रौल कॅस्ट्रो यांची बैठक होत आहे. शीतयुद्धानंतर क्युबा व अमेरिका यांच्यातील संबंध ताणलेले होते. नंतर अमेरिकेने क्युबावर आर्थिक र्निबध लादून त्यांना जेरीस आणले. क्युबा हा रशियाचा मित्र देश मानला जात होता. ओबामा यांचे आज फ्लोरिडाहून येथे आगमन झाले. ८८ वर्षांत क्युबाला भेट देणारे ते पहिले अमेरिकी अध्यक्ष आहेत. ओबामा यांचे एअर फोर्स वन विमान हवाना येथे उतरले असता ओबामा यांनी क्यू बोला क्युबा.. व्हॉट्स अप.. या अर्थाने ट्विट केले. अमेरिकेचे अध्यक्ष असलेले कॅलविन कुलिज यांनी १९२८ मध्ये क्युबाला भेट दिली होती. आता ओबामा यांचा दौरा तीन दिवसांचा आहे. ते म्हणाले की, ही ऐतिहासिक भेट आहे. ‘इंटर अमेरिकन डायलॉग थिंकटँक’ चे प्रमुख मायकेल शिफ्टर यांनी सांगितले की, अमेरिकी अध्यक्ष अमेरिका व क्युबा यांच्यातील संबंध १९५८ मध्ये अधिकच ताणले गेल्यानंतर आता येथे येत आहेत त्यामुळे दोन्ही देशातील दुरावा संपुष्टात येईल. आता अमेरिकी लोकांवर क्युबात जाण्यास घातलेले निर्बंध उठवले जाणार आहेत व त्याचे चांगले परिणाम दिसतील. ओबामा यांच्या आगमनापूर्वी हवाना येथे पोलिसांनी मानवी हक्क गटाच्या कार्यकर्त्यांंची प्रतिबंधात्मक उपाय म्हणून धरपकड केली नंतर त्यांना सोडून देण्यात आले. शिफ्टर यांनी सांगितले की, ओबामा यांच्या भेटीने क्युबाचे राजकारण लगेच बदलणार नाही. संबंध सुरळित होण्यास वेळ लागेल. क्युबावरील आणखी र्निबध मागे घेणे गरजेचे आहे. मानवी हक्क कार्यकर्त्यांना ओबामा भेटणार असून त्यांचे भाषण क्युबा दूरचित्रवाणीवरून प्रसारित केले जाणार आहे.