Barack Obama Statement US Midterms 2026 : अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांच्या निकालानंतर माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अमेरिकन जनतेचे आभार मानत राजकीय नेतृत्वाला महत्त्वाचा संदेश दिला आहे. अमेरिकेच्या जनतेने या निवडणुकीत स्पष्ट संदेश दिला असून, त्यांना समाजात फूट पाडणारे नव्हे, तर लोकांना एकत्र आणणारे राजकारण हवं आहे. तसंच जनतेसमोरील समस्यांवर ठोस उपाय सुचवणारे नेतृत्व अपेक्षित असल्याचं ओबामा यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी सविस्तर पोस्ट केली आहे.

वेगळ्या विचारधारेची माणसं एकत्र

ओबामा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत निवडणूक निकालांवर प्रतिक्रिया दिली. या निवडणुकीतील यश हे देशाच्या प्रत्येक भागातून पुढे आलेल्या उत्कृष्ट उमेदवारांमुळे शक्य झाल्याचं त्यांनी सांगितलं. विशेषतः ज्या मतदारसंघांमध्ये विजयाची शक्यता कमी मानली जात होती, अशा ठिकाणीही उमेदवारांनी ताकदीने निवडणूक लढवली. या उमेदवारांची पार्श्वभूमी वेगवेगळी होती आणि त्यांचे राजकीय विचारही भिन्न होते. मात्र, सार्वजनिक सेवेवरील विश्वास, समान मूल्ये आणि आपल्या मतदारसंघातील जनतेला प्राधान्य देण्याची बांधिलकी या समान गोष्टींनी त्यांना एकत्र आणलं, असं ओबामा यांनी नमूद केलं.

देशाचं नुकसान होण्यापासून रोखा

निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी योगदान देणाऱ्या हजारो निवडणूक अधिकाऱ्यांचे आणि स्वयंसेवकांचेही त्यांनी विशेष आभार मानले. दोन्ही राजकीय पक्षांतील या अधिकारी आणि स्वयंसेवकांनी लोकशाहीतील अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडल्याचे त्यांनी म्हटलं. दरम्यान, विद्यमान ट्रम्प प्रशासनाच्या कार्यकाळातील आणखी दोन वर्षे बाकी असल्याचे ओबामा यांनी अधोरेखित केले. मात्र, आता लोकशाहीवादी शक्तींनी केवळ निकालांवर समाधान न मानता प्रत्यक्ष कामाला लागण्याची गरज आहे. जिथे बदल घडवण्याची संधी आणि अधिकार आहेत, तिथे बदल घडवावेत, देशाचं आणखी नुकसान होण्यापासून रोखावं आणि भविष्यातील चांगल्या वाटचालीसाठी पायाभरणी करावी, असं आवाहनही त्यांनी केलं.

ओबामा यांच्या या विधानातून मध्यावधी निवडणुकांच्या निकालानंतर ट्रम्प प्रशासनाविरोधात राजकीय पातळीवर सक्रिय राहण्याचा आणि आगामी काळासाठी तयारी करण्याचा संदेश देण्यात आल्याचं दिसून येतंय.