पाकिस्तान ते पॅरिस सर्व ठिकाणच्या अतिरेक्यांविरुद्ध लढण्यासाठी काँग्रेसने नवीन युद्धाधिकार मंजूर करावेत त्याचबरोबर इराणवर त्यांच्या वादग्रस्त अणुकार्यक्रमाच्या अनुषंगाने आणखी र्निबध लादू नयेत, असे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी सांगितले.
ओबामा यांनी वार्षिक भाषणात सांगितले की, आम्ही अतिरेक्यांनी लक्ष्य केलेल्या लोकांच्या पाठीशी उभे आहोत. पाकिस्तानात पेशावरमध्ये मुलांवर झालेला हल्ला व पॅरिसमधील हल्ले या सर्व घटनात आम्ही लक्ष्य करण्यात आलेल्यांच्या पाठीशी आहोत.
सुमारे ४० लोकप्रतिनिधींनी पिवळ्या पेन्सिली झळकावून त्यांच्या या म्हणण्याला दाद दिली, पॅरिसमधील हल्ल्यात १७ तर पेशावरमधील हल्ल्यात दीडशे जण ठार झाले आहेत. फ्रान्समधील व्यंगचित्रकारांवर झालेल्या हल्ल्यानंतर पिवळी पेन्सिल ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची प्रतीक आहे.
ओबामा यांनी सांगितले की, आम्ही अतिरेक्यांच्या मागावर राहू व त्यांचे अड्डे उद्ध्वस्त करू. आम्हाला एकतर्फी कारवाई करण्याचे अधिकार आहेत. आपल्या देशाला व मित्र देशांना भीती असलेल्या अतिरेक्यांचा बीमोड केला जाईल.
इराक व अफगाणिस्तानातील दहशतवादापासून अमेरिका अनेक धडे शिकली आहे. दक्षिण आशिया ते उत्तर आफ्रिकेपर्यंत सर्वच ठिकाणी अतिरेक्यांना आश्रय देणाऱ्या देशात आम्ही कारवाई केली. सीरिया व इराकमध्ये इस्लामिक स्टेटची घोडदौड अमेरिकी लष्कराने रोखली आहे त्यामुळे दहशतवादाच्या विरोधात आमची एकजूट आहे हे दिसून आले आहे. इराणविरोधात आणखी र्निबध लादण्याचे प्रयत्न अमेरिकी काँग्रेसने केल्यास त्यावर आपण नकाराधिकार वापरू असा इशारा ओबामा यांनी दिला आहे कारण इराणने त्यांचा अण्वस्त्र कार्यक्रम बंद करावा यासाठी चालू असलेल्या वाटाघाटीत त्यामुळे अडथळा येऊ शकतो.

आम्ही अतिरेक्यांच्या मागावर राहू व त्यांचे अड्डे उद्ध्वस्त करू. आपल्या देशाला व मित्र देशांना भीती असलेल्या अतिरेक्यांचा बीमोड केला जाईल.
– बराक ओबामा