Baramati man kills wife Karnataka: पत्नीचा गळा चिरुन, कारखाली चिरडत तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार कर्नाटकमध्ये उघडकीस आला आहे. हे दाम्पत्य मूळचे महाराष्ट्रातील बारामतीचे असून, देवदर्शनाला गेले असता कलबुर्गी जिल्ह्यात ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. पती पत्नीला बेदम मारहाण केल्यानंतर तिच्या अंगावरुन कार घेऊन जाताना व्हिडीओत दिसत आहे.
भांडणानंतर बेदम मारहाण
शैला असे खून झालेल्या २८ वर्षीय महिलेचे नाव आहे. तर, पोलिसांंनी संशयित पती अक्षयला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय आणि पत्नी शैला कलबुर्गी जिल्ह्यात देवदर्शनासाठी गेले होते. गाणगापूरला जात असताना रस्त्यात बल्लुरगी येथे दोघांमध्ये काडक्याचे भांडण झाले. संतापलेल्या अक्षयने रागाच्या भरात पत्नी शैलाला कारच्या बाहेर ओढून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या सगळा प्रकार स्थानिकांनी मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला.
गळा चिरला, कारने चिरडले
यानंतर अक्षयने धारदार शस्त्राने पत्नीचा गळा चिरला व रक्त्याच्या थारोळ्यात पडलेल्या शैलाला कारखाली चिरडले. यातच तिचा मृत्यू झाला. या घटनेचे दोन व्हिडीओ सध्या समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहेत. व्हिडीओत पीडित महिला मदतीसाठी आक्रोश करताना दिसत आहे. दरम्यान, संशयित पतीने पत्नीच्या हत्येचा कट पूर्वीच रचला होता असा संशय व्यक्त केला जात आहे. देवदर्शनाच्या नावाखाली त्याने फूस लावून पत्नीला कर्नाटकात आणल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
चार वर्षांच्या संसाराचा भीषण शेवट
कलबुर्गी पोलिसांनी याप्रकरणी संशयित अक्षयला अटक केली आहे. मृत शैला आणि पती मूळचे बारामती, महाराष्ट्राचे रहिवासी आहेत. त्यांच्या लग्नाला चार वर्षे झाली होती. चारित्र्याच्या संशयावरुन अक्षयने पत्नीच्या हत्येचा कट रचला होता, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेचा अधिक तपास सुरु असल्याची माहिती कलबुर्गी पोलिसांनी दिली आहे.
चारित्र्याच्या संशयावरुन पूर्वनियोजित कट?
अक्षयला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. पत्नीचा काटा काढण्यासाठी त्याने देवदर्शनाचा प्लॅन करुन पत्नीला कर्नाटकात आणले होते, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून त्याने हत्येचा कट रचाला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, यादृष्टीने तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
