कॅरेबियन बेटांवर वसलेल्या बार्बाडोस देशाचा आज नव्याने प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून जन्म झाला आहे. गेल्या ४०० वर्षांपासून या बेटावर असलेला ब्रिटनच्या राणीचा अंमल आता संपुष्टात आला आहे. ब्रिटनची राणी एलिझाबेथ दुसरी हिला बार्बाडोसच्या प्रमुख पदावरून हटवण्यात आल्याचं सोमवारी मध्यरात्री जाहीर करण्यात आला. बार्बाडोसची राजधानी असलेल्या ब्रिजटाऊनमध्ये यानिमित्ताने प्रचंड जल्लोष आणि आनंदाचं वातावरण दिसून आलं शहरातल्या हिरोज स्क्वेअरमध्ये जमून बार्बाडोसच्या जनतेनं यानिमित्ताने प्रचंड जल्लोष करत आपला आनंद व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वास्तविक १९६६ मध्येच बार्बाडोसनं स्वत:ला ब्रिटिशांच्या ३०० वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त करून घेतलं होतं. पण त्यानंतर देखील बार्बाडोसचं प्रमुखपद मात्र ब्रिटनच्या राणीच्या नावेच चालवलं जात होतं. २००५मध्ये या विरोधात बार्बाडोसनं त्रिनिदादमधील कॅरेबियन कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये अपील केलं. बार्बाडोसबाबत लंडनमध्ये असलेल्या प्रिव्यु कौन्सिलला देखील रद्दबातल ठरवलं. मात्र, तरीदेखील ब्रिटनच्या राणीचा बार्बाडोसवरील अंमल काही संपलेला नव्हता. २००८मध्ये पुन्हा एकदा बार्बाडोसनं देशाला प्रजासत्ताक बनवण्याचा प्रस्ताव मांडला. मात्र, त्याला अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलं होतं. अखेर सोमवारी मध्यरात्रीनंतर बार्बाडोसवरून ब्रिटनच्या राणीचा अंमल पूर्णपणे हटल्याचं जाहीर करण्यात आलं.

वसाहतवादावर ‘फुल्ल स्टॉप’

बार्बाडोस रिपब्लिकन चळवळीचे नेते माया मोटले हे ब्रिटनपासून पूर्णपणे स्वतंत्र झालेल्या बार्बाडोसचे पहिले पंतप्रधान असतील. तर सँड्रा मसॉन या बार्बाडोसच्या पहिल्या राष्ट्राध्यक्ष असतील. “वसाहतवादाच्या अध्यायावर फुल्ल स्टॉप” अशा शब्दांत या घटनेचं वर्णन बार्बाडोसमधील प्रसिद्ध कवी विन्स्टन फर्रेल यांनी केलं आहे.

या घटनेनंतर बार्बाडोस ब्रिटनच्या राणीच्या अंमलाखालून पूर्णपणे मुक्त झाला असला, तरी आफ्रिका, आशिया, अमेरिका आणि युरोप या खंडांमधील देशांच्या मिळून बनलेल्या कॉमनवेल्थचा बार्बाडोस घटक असणार आहे.

ब्रिटनच्या राणीचा अंमल संपुष्टात आणण्याची प्रक्रिया गेल्या अनेक महिन्यांपासून बार्बाडोसमध्ये सुरू होती. सँड्रा मसॉन यांची महिन्याभरापूर्वी बार्बाडोसच्या हाऊस ऑफ असेम्ब्ली आणि सिनेटनं राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड केली आहे. अवघी ३ लाख लोकसंख्या असलेल्या या देशानं गेल्या चार शतकांपासून ब्रिटनशी वसाहतवादाचे संबंध कायम ठेवले होते. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये पूर्ण स्वातंत्र्याची मागणी जोर धरू लागली होती. ब्रिटनच्या राणीचा अंमल संपुष्टात आल्यामुळे आता बार्बाडोस जागतिक स्तरावर स्वत:च्या जोरावर पुढे जाऊ शकेल, अशी प्रतिक्रिया बार्बाडोसमधील नव्या प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Barbados removes queen elizabeth ii as head of state becomes republic pmw
First published on: 30-11-2021 at 17:06 IST