उभ्या देशाला हादरवून सोडणाऱ्या वर्धमान स्फोट प्रकरणाच्या सूत्रधाराच्या पत्नीस तिच्या तीन साथीदारांसह बांगलादेशात अटक करण्यात आली आहे. फातिमा बेगम असे तिचे नाव असून या चौघा जणांव्यतिरिक्त पाच संशयित अतिरेक्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. या अतिरेक्यांमध्ये एका पाकिस्तानी नागरिकाचाही समावेश आहे.
२ ऑक्टोबर रोजी पश्चिम बंगालमधील वर्धमान येथे झालेल्या स्फोटात दोन जण ठार झाले होते. भारताच्या राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत या प्रकरणाचा तपास सुरू असून, या स्फोटामागे साजिद नावाचा अतिरेकी असावा असा कयास आहे. त्या पाश्र्वभूमीवर रविवारी येथे साजिद याची पत्नी फातिमा बेगम हिला अटक करण्यात आली. भारतातील किमान २५ महिलांना अतिरेकी प्रशिक्षण दिल्याची कबुली फातिमाने दिली आहे.
बांगलादेशात बंदी घालण्यात आलेल्या ‘जम्मात-उल-मुजाहिद्दीन बांगलादेश’ या अतिरेकी संघटनेच्या महिला आघाडीचे नेतृत्व फातिमाकडे होते. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि येथील मुख्य विरोधी पक्षनेत्या खालिदा झिया यांना या अतिरेकी संघटनेने लक्ष्य केले होते, अशी माहिती ढाका शहर पोलीस उपायुक्त मसुदूर रेहमान यांनी दिली.ढाक्यातील सदरघाट येथून फातिमा बेगम आणि तिच्या तीन साथीदारांना स्फोटके, स्फोटके तयार करण्याचे साहित्य आणि प्रक्षोभक जिहादी मजकूर असलेल्या पुस्तकांसह अटक करण्यात आली. भारताच्या राष्ट्रीय तपास संस्थेने पुरविलेल्या महत्त्वाच्या दुव्यांच्या आधारे ही केली.