उत्तर प्रदेशातील बरेली येथील ‘सिटी सेंटर एलए मॉल’मध्ये रविवारी रात्री एक मोठी दुर्घटना टळली. मॉलची वीज गुल झाल्यामुळे महिला आणि लहान मुलांसह तब्बल १३ जण तब्बल अर्धा तास लिफ्टमध्ये अडकून पडले. या घटनेमुळे मॉल प्रशासनाच्या आपत्कालीन व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सिव्हिल लाइन्स परिसरातील मॉलमध्ये रात्री १० च्या सुमारास घडली. चित्रपट पाहून परतणारे काही प्रेक्षक लिफ्टमधून खाली येत असताना अचानक वीज गेली आणि लिफ्ट दोन मजल्यांच्या मध्येच अडकली. लिफ्टमध्ये हवा खेळती नसल्याने आणि प्रचंड उकाड्यामुळे आतमध्ये असलेल्या लोकांचा जीव गुदमरू लागला. लहान मुले घाबरून रडू लागली, तर आतमध्ये असलेल्या लोकांमध्ये प्रचंड घबराट पसरली.
हेल्पलाइन नंबरवर प्रतिसाद नाही
त्रास वाढू लागल्याने लिफ्टमधील लोकांनी आत लिहिलेल्या आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांकावर वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. इतकेच नव्हे तर मॉलचे सुरक्षा रक्षकही तातडीने मदतीसाठी पोहोचू शकले नाहीत. यामुळे अडकलेले लोक आणि बाहेर थांबलेल्या त्यांच्या नातेवाईकांमध्ये मॉल प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत होता.
याच दरम्यान, बिहारिपूर येथील १७ वर्षीय शालिनी नावाच्या तरुणीला गुदमरल्यासारखे झाल्याने आणि प्रचंड भीतीमुळे ती लिफ्टमध्येच बेशुद्ध पडली. शेवटी जीव वाचवण्यासाठी आतल्या लोकांनी लिफ्टचे दरवाजे जबरदस्तीने उघडण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यानंतर बाहेर उपस्थित असलेल्या नागरिकांनी आणि मॉलच्या कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली.
अर्ध्या तासानंतर सुटका
जवळपास ३० मिनिटांच्या अथक प्रयत्नांनंतर लिफ्टचे दरवाजे उघडण्यात आले आणि सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. बेशुद्ध पडलेल्या तरुणीला बाहेर आणून प्रथमोपचार दिल्यानंतर तिची प्रकृती स्थिर झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मॉलमध्ये धाव घेतली आणि पीडितांचे जबाब नोंदवले.
तांत्रिक बिघाड की मानवी चूक? तपास सुरू
या घटनेबाबत बरेलीचे एसपी सिटी मानुष पारीख यांनी सांगितले की, माहिती मिळताच तात्काळ तांत्रिक पथक घटनास्थळी पाठवून सर्वांची सुखरूप सुटका करण्यात आली. प्राथमिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या पाहणीनंतर, वीज गेल्यामुळे लिफ्टच्या सेन्सर्सनी काम करणे बंद केल्याचे समोर आले आहे.
दुसरीकडे, मॉल प्रशासनाने असा दावा केला आहे की, वीज गेल्यावर बॅकअपसाठी जनरेटर सुरू केला जात होता. मात्र, त्याच वेळी लिफ्टमध्ये अडकलेल्या एका व्यक्तीने घाबरून दरवाजावर लाथ मारली, ज्यामुळे लिफ्टची सेन्सर यंत्रणा पूर्णपणे लॉक झाली. सध्या पोलीस या प्रकरणाचा तांत्रिक बाजूने सखोल तपास करत असून, रीतसर तक्रार आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.
