Digital Arrest Cyber Fraud Bareilly incident: केंद्र सरकार आणि विविध बँकांकडून वारंवार सायबर फसवणूक आणि डिजिटल अरेस्टबाबत विविध माध्यमाद्वारे माहिती दिली जात असते. सायबर चोरटे लोकांना फसविण्याचे नवनवीन मार्ग शोधून काढत असतात. अशा फसवणुकीला बळी पडू नये म्हणून जनजागृती केली जाते. मात्र तरीही अनेकजण बळी पडताना दिसतात. उत्तर प्रदेशच्या बरेलीमधील एका दांपत्याला डिजिटल अरेस्टचा सामना करावा लागला. तब्बल १० तास डिजिटल अटकेत असलेल्या दांपत्याची त्यांच्या आठवीत शिकणाऱ्या मुलाने सुटका केली. या मुलाचे आता कौतुक होत आहे.

ही घटना बरेलीच्या प्रेम नगर परिसरात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी शहरातील व्यावसायिक संजय सक्सेना आणि त्यांच्या पत्नीला लक्ष्य केले. नेहमीप्रमाणे तपास यंत्रणांमधून बोलत असल्याचे कारण सांगितले.

चोरट्यांनी सक्सेना यांना दहशतवाद आणि कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराशी तुमचा संबंध आल्याची थाप मारली. तसेच व्हिडीओ कॉलवर खोटे अटक वॉरंटही दाखवले. डिजिटल अटकेच्या बहाण्याने चोरट्यांनी दांपत्याला फोनसमोरच बसून राहण्यास आणि त्यांचे म्हणणे ऐकण्यास भाग पाडले. त्यांच्यावर मानसिक दबावही टाकला.

इतर डिजिटल अटकेत जो प्रकार घडतो, तोच इथेही घडला. दांपत्याला घरातून बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली. तसेच व्हिडीओ कॉल बंद न करण्याची धमकी दिली. जेवताना, आराम करतानाही व्हिडीओ कॉल सुरुच ठेवावा, असे धमकावण्यात आले. दीर्घकाळ चाललेल्या या डिजिटल अटकेदरम्यान चोरट्यांनी सक्सेना यांच्या बँक खात्याचा तपशीलही त्यांच्याकडून घेतला.

जवळपास १० तास हा सर्व प्रकार सुरू होता. या काळात दांपत्ये इतके भेदरले होते की, त्यांनी उलट प्रश्न विचारणेही थांबवले होते.

तन्मयने आई-वडिलांना थांबवले

सक्सेना यांचा मुलगा तन्मय आठवीत शिकतो. आपल्या आई-वडिलांना भेदरलेल्या अवस्थेत पाहून त्याला शंका आली. त्याने आई-वडिलांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण घाबरलेल्या पालकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. अखेर रात्री संधी साधून तन्मयने व्हिडीओ कॉल सुरू असलेला फोन फ्लाइट मोडवर टाकला आणि चोरट्यांशी सुरू असलेला कॉल बंद झाला.

तन्मयने वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे महत्त्वाच्या टप्प्यावर चोरट्यांचा संपर्क तोडला गेला. त्यामुळे त्यांना सक्सेना यांच्या बँक खात्यातून पैसे काढण्याची संधी मिळाली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सक्सेना यांनी प्रेम नगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन याबद्दलची तक्रार दिली.

जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी फोन सुरू करण्यात आला तेव्हा चोरट्यांनी पुन्हा फोन केला. मात्र यावेळी त्यांना पोलिसांनी उत्तर दिले. जिल्हा पोलीस अधीक्षक मनुश परीक यांनी याबद्दल गुन्हा नोंद झाल्याचे सांगितले. त्यांनी लहान तन्मयचे कौतुक केले. तसेच इतरांनीही आवाहन करताना डिजिटल अरेस्ट किंवा इतर सायबर फसवणुकीला बळी न पडण्याचे आवाहन केले.