UP Storm Flying Man Video: उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पावसासह अनेक जिल्ह्यात भीषण वादळाचा तडाखा बसला. बुधवारी वादळाचा तडाखा बसल्यामुळे २४ तासांत किमान १११ जणांचा मृत्यू झाला असून ७२ जण जखमी झाले आहेत. या वादळाचे धक्कादायक फोटो आणि व्हिडीओ आता समोर येत आहेत. बरेलीच्या बामियाना गावातील एका घटनेत एक व्यक्ती पत्र्याच्या शेडसह हवेत ५० फूट उंच उडाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ पाहून अनेकांचा थरकाप उडाला. सुदैवाने या व्यक्तीचा जीव वाचला असून हवेत उडाल्याच्या घटनेबद्दल त्याने सविस्तर माहिती दिली आहे.

हवेत उडणारा व्यक्ती कोण?

बरेली शहरापासून सुमारे २२ किमी अंतरावर असलेल्या बामियाना गावातील ५० वर्षीय नन्हे खान हवेत उडाला. गावातील लग्नाच्या हॉलच्या पत्र्याच्या शेडला पकडून उभा असलेला नन्हे खान ५० फूट उंच आणि १०० मीटर दूर अंतरावर फेकला गेला. जवळच्या मक्याच्या शेतात पडल्यामुळे त्याच्या हात आणि पायाला फ्रॅक्चर झाले.

नन्हे खान काय म्हणाले?

नन्हे खान सामान आणण्यासाठी लग्नाच्या हॉलमध्ये गेला होता. तेव्हा हवामानात अचानक बदल झाला. जोरदार वाऱ्यामुळे पत्र्याचे शेड मुळासकट उखडू लागले. शेड उडून जाईल या भीतीने त्यांनी त्याला दोरी बांधली आणि स्वतः दोरी धरली. मात्र वाऱ्याचा वेग जोरदार असल्यामुळे शेड तुटले आणि नन्हे खानही त्याबरोबर उडाले.

नन्हे खान सुमारे सात सेकंद हवेत तरंगत होते. त्यानंतर वाऱ्याच्या वेगाने त्यांना जवळच्या मक्याच्या शेतात फेकले. “हवेत उडून खाली पडल्यानंतर मला पुढचे फार काही आठवत नाही. पण मक्याच्या शेतात पाणी साचले असल्यामुळे मला गंभीर दुखापत झाली नाही. जेव्हा मी हवेत होतो तेव्हा मला वाटले की, माझ्या मुलांना मी पुन्हा कधीच पाहू शकणार नाही”, अशी आठवण नन्हे खान यांनी सांगितली.

बामियाना गावात वादळ आल्यानंतर काही मुलांनी नन्हे खान यांचा व्हिडीओ मोबाइलवर रेकॉर्ड केला होता. काही वेळातच गावात आणि नंतर संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये व्हायरल झाला. पुढे एक्स, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि इतर सोशल मीडिया साईटवरही हा व्हिडीओ व्हायरल झाला. पत्र्याच्या शेडबरोबर हवेत उंचावर उडालेले नन्हे खान काही सेकंदात खाली पडतात. अनेकांनी हा व्हिडीओ वारंवार पाहिला. अनेकांनी ते वाचले की नाही? असाही प्रश्न उपस्थित केला.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, गावातील १६ वर्षीय तरुण राजन अन्सारी याने हा व्हिडीओ चित्रित केला आहे. आपल्या घराच्या गच्चीवरून वादळाचे विक्राळ स्वरुप मोबाइलमध्ये रेकॉर्ड करत असताना राजनला पत्र्याचे शेड हवेत उडणार असल्याचे दिसले. त्यामुळे त्याचे रेकॉर्डिंग करत असताना पुढे नन्हे खान हवेत उडाल्याचे दिसले. राजन म्हणाला, “मी वादळाचे चित्रीकरण करत असताना मला नन्हे खान वर उडत असल्याचे दिसले. ही क्लीप व्हायरल झाल्यानंतर आता नन्हे खानला बरेलीचा फ्लाईंग मॅन म्हटले जात आहे.”

नन्हे खानला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर आता त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र घरी गेल्यानंतर प्रकृती खालावल्यामुळे दुसऱ्या दिवशी त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. नन्हे खान पत्नी अंजुम बेगम आणि पाच मुलांसह गावात राहतात. उपजीविकेसाठी ते ई-रिक्षा चालवतात आणि मजुरी करतात.

Uttar Pradesh Storm Deaths
उत्तर प्रदेशात निसर्गाचा हाहाकार पाहायला मिळत असून, वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसात १०० हून अधिक जणांचा जीव गेला.

१११ जणांचा बळी, ७२ जखमी

उत्तर प्रदेशमधील वादळाने हाहाकार उडाला असून राज्यभरात १११ जणांचा मृत्यू आणि ७२ जण जखमी झाले आहेत. ताज्या माहितीनुसार या वादळाचा २६ जिल्ह्यांना फटका बसला आहे. वादळामुळे १७० जनावरे दगावली असून २२७ घरांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका प्रयागराज जिल्ह्याला बसला असून जिल्ह्यात २१ मृत्यूंची नोंद झाली. त्याखालोखाल मिर्झापूर १९, भदोही १६, फतेहपूर ११ आणि बरेलीमध्ये २ मृत्यूंची नोंद झाली.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाला नुकसान किती झाले, याचा आढावा घेण्याचे निर्देश दिले. तसेच २४ तासांत बाधित कुटुंबांना नुकसान भरपाई आणि मदत मिळेल, याची खात्री करण्याचे निर्देश दिले. मृतांच्या वारसांना ४ लाख रुपयांची तात्काळ आर्थिक मदत दिली जाईल, अशीही घोषणा करण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काही ठिकाणी वाऱ्याचा वेग ताशी १०० किमी पेक्षा जास्त होता. तर काही ठिकाणी वाऱ्याचा वेग ताशी ६०-७० किमी इतका होता.