Barkha Trehan Ink Attack on Abhijit Dipke: राजधानी दिल्लीत गेल्या तीन आठवड्यांपासून CJP अर्थात कॉक्रोच जनता पार्टी संघटनेचं आंदोलन आणि पर्यावरणविषयक मुद्द्यांचे पुरस्कर्ते सोनम वांगचुक यांच्या बेमुदत उपोषणामुळे वातावरण तापलं आहे. NEET पेपर फुटीमुळे झालेल्या गोंधळाची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सीजेपीसह सोनम वांगचुक यांनी केली असून त्याचसाठी वांगचुक बेमुदत उपोषणाला बसले होते. शनिवारी सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी बळजबरीने रुग्णालयात दाखल केलं. यानंतर माध्यमांशी बोलताना अभिजित दिपके यांच्यावर एका महिलेनं शाईफेक केली असून त्यांचं नाव बरखा त्रेहन असल्याची माहिती समोर आली आहे.

अभिजित दिपकेंवर शाईफेक

सोनम वांगचुक यांना शनिवारी भल्या सकाळी पोलीस प्रशासनाने सक्तीने आंदोलन स्थळावरून उचलून नेलं. यानंतर त्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यासंदर्भात जंतर-मंतरवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना CJP चे संस्थापक अभिजित दिपके यांच्यावर एका महिलेनं गर्दीतून येऊन शाईफेक केली. त्यानंतर तात्काळ बरखा त्रेहन यांना सीजेपीच्या कार्यकर्यांनी तिथून बाजूला नेलं. त्यांनी दिपकेंवर शाईफेक का केली? याचं कारण तात्काळ समोर येऊ शकलं नसलं, तरी नंतर पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीमध्ये या गोष्टीचा खुलासा झाला आहे.

इंडियन एक्स्प्रेसनं दिल्ली पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, अभिजित दिपके माध्यमांसमोर भूमिका मांडत असताना बरखा त्रेहन या कुणाच्याही नकळत त्यांच्या जवळ पोहोचल्या आणि त्यांनी दिपकेंवर निळ्या रंगाची शाई फेकली. झाल्या प्रकारामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, सीजेपीच्या कार्यकर्त्यांनी लागलीच बरखा त्रेहन यांना तिथून हलवून संसद मार्ग पोलीस स्थानकात नेलं.

कोण आहेत बरखा त्रेहन?

बरखा त्रेहन या स्वत:ची पुरुषांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून ओळख करून देतात. जेव्हा त्यांनी अभिजित दिपकेंवर शाई फेकली, तेव्हा त्या ‘जय श्री राम’ अशा घोषणा देत होत्या, अशी माहितीदेखील पोलिसांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली. त्रेहन यांच्या एक्स अकाऊंटच्या बायोमध्ये त्यांची ओळख पुरुषांसाठी आवाज उठवणाऱ्या, पुरुष आयोगाच्या अध्यक्षा, टेडएक्स स्पीकर, हिंदू नवउद्योजक व दी कर्स ऑफ मॅनहूड डॉक्युमेंटरीच्या दिग्दर्शिका अशी देण्यात आली आहे.

याआधी बरखा त्रेहन या जंतर मंतरवर २५ डिसेंबर २०२५ रोजी दिसल्या होत्या. त्यावेळी त्या ‘पुरुष आयोग’ या त्यांच्या संघटनेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या एका निदर्शनात सहभागी झाल्या होत्या. उन्नावमध्ये १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी शिक्षा झालेल्या तत्कालीन भाजपा आमदार कुलदीप सेनगर याच्या समर्थनार्थ ही निदर्शनं करण्यात आल्याची माहितीदेखील संबंधित पोलीस अधिकाऱ्याने दिली. याशिवाय, बरखा त्रेहन वृत्तवाहिन्यांवरील चर्चांमध्येही दिसतात. काही माध्यम समूहांसाठी त्या स्तंभलेखनदेखील करत असल्याची माहिती आहे.

बरखा त्रेहन यांना फक्त आंदोलन स्थळापासून लांब नेण्यात आलं असून त्यांना ताब्यातदेखील घेतलं गेलं नव्हतं. कोणताही गुन्हा त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आला नसून त्यांना सोडून देण्यात आलं आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

शाईफेकीनंतर बरखा त्रेहन यांची पोस्ट

दरम्यान, अभिजित दिपकेंवर शाईफेक केल्यानंतर बरखा त्रेहन यांनी त्यांच्या X अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये आपणच शाईफेक केल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. “होय, मी बरखा त्रेहन आणि त्या कट्टर अर्बन नक्षल अभिजित दिपकेवर मीच शाई फेकली. कारण जेव्हा माझ्या प्रभू श्रीरामाचा कॉकरोच जनता पार्टीच्या व्यासपीठावर अवमान झाला, तेव्हा तो हसला होता. मी एक कट्टर हिंदू आहे. मी प्रचंड विचलित झाले होते. मी या माध्यमातून माझा निषेध नोंदवला आहे. मला त्याचा गर्व आहे. जय हिंद, जय श्री राम”, असं बरखा त्रेहन यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.