Barmer Woman Sarpanch Speech Viral Video: आयएएस अधिकारी टीना दाबी यांची काही दिवसांपूर्वी राज्यस्थानमधील बारमेरमध्ये जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे. त्याआधी त्या जैसलमेरच्या जिल्हाधिकारी होत्या. टीना दाबी या आपल्या कामामुळे नेहमी चर्चेत असतात. टीना दाबी यांनी बारमेरमध्ये एका कार्यक्रमाला हजेरी लावली असता त्या कार्यक्रमात टीना दाबी यांच्यासमोर एका महिला सरपंचाने इंग्रजीमधून केलेल्या भाषणाची मोठी चर्चा रंगली आहे. तसेच महिला सरपंचाने इंग्रजीमधून केलेल्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नेमकी काय घडलं?

राजस्थानच्या बारमेरमधील एका आयोजित कार्यक्रमासाठी टीना दाबी यांना बोलावण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहूण्या टीना दाबी या होत्या. यावेळी त्या ठिकाणी एका सरपंच महिलेने इंग्रजीमधून भाषण केलं. त्या सरपंच महिलेचं नाव सोनू कंवर असं आहे. त्या व्यासपीठावर भाषण करत असताना त्यांनी पारंपरिक राजस्थानी पोशाख परिधान केलेला असल्याचं दिसत आहे. मात्र, त्यांचं इंग्रजीमधील भाषण ऐकून टीना दाबी या स्वतः आश्चर्यचकीत झाल्या. एवढंच काय तर महिला सरपंचाच्या भाषणानंतर टीना दाबी यांच्यासह उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

हेही वाचा : रस्त्यावर ‘येई हो विठ्ठले’ची धून अन् फ्लॅटमधील महिलेचा डान्स, लोखंडवालातील व्हायरल VIDEO एकदा बघाच

महिला सरपंचांनी भाषणात काय म्हटलं?

महिला सरपंच सोनू कंवर यांनी आपल्या भाषणात म्हटलं की, “मला या ऐतिहासिक दिवसाचा एक भाग होताना आनंद होत आहे. सर्वप्रथम मी आमच्या जिल्हाधिकारी टीना दाबी यांचे स्वागत करते. मी देखील एक महिला असल्याने मला टीना दाबी यांचे स्वागत करताना अभिमान वाटतो.” दरम्यान, सोनू कंवर या राजस्थानमधील जालपा येथील सरपंच असल्याची माहिती सांगितली जात आहे. महिला सरपंच सोनू कंवर यांचं इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व पाहून टीना दाबी यांच्यासह अनेकजणांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

टीना दाबी यांनी सोनू कंवर यांचं केलं कौतुक

सरपंच सोनू कंवर यांनी इंग्रजीमध्ये भाषण करत जिल्हाधिकारी टीना दाबी यांचं स्वागत केलं. मात्र, सरपंच सोनू कंवर यांचं इंग्रजी विषयावरील प्रभुत्व पाहून टीना दाबीसह सर्वांनीच सरपंच सोनू कंवर यांचं टाळ्या वाजवत कौतुक केलं.