‘परदेशी निधीचा वापर इस्लाम धर्मातरासाठी’ ; पोलिसांचे बडोदा न्यायालयात आरोपपत्र

एक प्रमुख आरोपी मोहम्मद उमर गौतम याने सुमारे १०० ते २०० हिंदू मुलींचे इस्लाममध्ये धर्मातर केले.

प्रतिनिधिक छायाचित्र

अहमदाबाद : बडोदा येथील एका धर्मादाय न्यासाने (चॅरिटेबल ट्रस्ट) परदेशी निधी वळवल्याशी संबंधित एका प्रकरणातील प्रमुख आरोपीने सुमारे १०० ते २०० हिंदू मुलींचे इस्लाममध्ये धर्मातर करण्यासाठी त्यांच्याशी विवाह केला आणि त्यांना सोडून दिले, असे पोलिसांनी गुजरातच्या एका न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे. परदेशी निधीचा वापर इस्लाम धर्मातरासाठी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

या धर्मादाय न्यासाच्या व्यवस्थापकीय विश्वस्ताने व त्याच्या साथीदारांनी परदेशातून निधी मिळवला होता. लोकांना इस्लाममध्ये धर्मातरित करण्यासाठी, मशिदी बांधण्यासाठी, तसेच सुधारित नागरिकत्व कायदाविरोधी निदर्शकांना आणि राजधानी दिल्लीत २०२० साली जातीय दंगली उसळल्यानंतर तेथे दंगलकर्त्यांंना कायदेशीर मदत देण्यासाठी त्यांना हा निधी बेकायदा वळवला, असा आरोप बडोदा पोलिसांनी मंगळवारी सादर केलेल्या आरोपपत्रात केला आहे.

पाच आरोपींची नावे असलेले १८६० पानांचे हे आरोपपत्र बडोद्याचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधकारी पी. ए. पटेल यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आले.

दिल्लीचा रहिवासी असलेला या प्रकरणातील एक प्रमुख आरोपी मोहम्मद उमर गौतम याने सुमारे १०० ते २०० हिंदू मुलींचे इस्लाममध्ये धर्मातर केले. त्यांच्याशी विवाह करून त्यांना सोडून देण्यात आल्याचे पोलिसांनी आरोपपत्रात नमूद केले आहे. त्याचप्रमाणे, त्याचा जवळचा सहकारी आणि बडोदा येथील एएफएमआय चॅरिटेबल ट्रस्टचा व्यवस्थापकीय विश्वस्त सलाउद्दीन शेख यानेही निरनिराळ्या धर्माच्या जवळपास १ हजार लोकांना निधीचा वापर करून इस्लाममध्ये धर्मातरित केले.

धर्मातर करणाऱ्यांमध्ये १० मूकबधिर व्यक्ती असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

तिघांना अटक, दोघे फरार

गौतम, शेख आणि शेखसाठी काम करणाऱ्या मोहम्मद मन्सूरी नावाच्या व्यक्तीला यापूर्वीच अटक करण्यात आली, तर गुजरातच्या भरुच जिल्ह्य़ाचा मूळ रहिवासी व सध्या लंडनमध्ये राहणारा अब्दुल्ला फेफडावाला आणि मूळचा मुंबईचा असलेला संयुक्त अरब अमिरातीचा रहिवासी मुस्तफा ठाणावाला हे फरार आहेत. लोकांना फसवून त्यांचे धर्मातर केल्याच्या आरोपाखाली गौतम याला उत्तर प्रदेशच्या दहशतवाद प्रतिबंधक विभागाने जून महिन्यात अटक केली. नंतर त्यांनी शेखलाही बडोद्यातून अटक केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Baroda police charitable trust uses foreign funds for islam conversion zws