West Bengal Baruipur Rape Accused Encounter Mother Reaction: पश्चिम बंगालच्या बरुईपूर येथे एका ११ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रभाष मंडलला गुन्हा घडला त्या ठिकाणी नेण्यात आले होते. गुन्ह्याचा घटनाक्रम जाणून घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न होता. मात्र आरोपीने पोलिसांची बंदूक हिसकावून गोळीबार केला. यात एक पोलीस जखमी झाला. यानंतर पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला, ज्यात मंडलचा मृत्यू झाला.
या चकमकीनंतर द इंडियन एक्सप्रेसने आरोपी प्रभाश मंडलच्या आई संध्या यांच्याशी संपर्क साधला. मुलाच्या मृत्यूवर बोलताना आई म्हणाल्या की, त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळाले आहे. तसेच मला त्याचा मृतदेहही पाहायचा नाही, असेही पोलिसांना कळवल्याचे संध्या मंडल यांनी सांगितले.
संध्या मंडल पुढे म्हणाल्या, “एक आई म्हणून मी दुःखी आहे. पण त्याला त्याच्या गुन्ह्याबद्दल शिक्षा मिळाली, याचेही समाधान वाटते. मी त्याचा मृतदेहही पाहणार नाही. त्याला पाहण्याची अजिबात इच्छा नाही. तो आमचे अजिबात ऐकत नव्हता. तो व्यसनी होता. आमच्याकडून त्याच्या अंत्यसंस्कारालाही कोण जाणार नाही.”
कुठे घडली घटना?
पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील बरुईपूर हे ठिकाण कोलकातापासून अवघ्या ३० किमी अंतरावर आहे. रविवारी बरुईपूर येथील एका तलावात ११ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर एकच खळबळ उडाली. शवविच्छेदनानंतर चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाला असल्याचे समोर आले. यानंतर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याबद्दल चार आरोपींना अटक करण्यात आली. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी सहा सदस्यांचे विशेष तपास पथक नेमण्यात आले आहे.
प्रभाष मंडल, आनंद सरदार आणि दिबाकर सरदार या तिघांना तात्काळ अटक करण्यात आली होती. त्यानंतर मंगळवारी रात्री आरोपी कबीर मोल्लाह यालाही ताब्यात घेतले गेले.
द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीनुसार, रविवारी तलावाजवळ मुलीचा मृतदेह आढळल्यानंतर बरुईपूर येथे एका संशयित आरोपीला जमावाने मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. यानंतर संतापलेल्या जमावाने रस्त्यावर उतरून निदर्शने करत टायर जाळले आणि रस्ता अडवला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
सुवेंदू अधिकारींकडून न्याय देण्याचे आश्वासन
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केल्याचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी सांगितले. या घटनेनंतर मी पीडितेच्या वडिलांशी बोललो. त्यांना प्रशासनाकडून जी काही मदत हवी असेल ती पुरवली जाईल. त्यांना न्याय मिळेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
सुवेंदू अधिकारी पुढे म्हणाले, पीडितेच्या कुटुंबाला न्याय तसेच गुन्हेगारांना मृत्यूदंडाची शिक्षा मिळावी, यासाठी आम्ही प्रयत्न करू. दरम्यान, एक झुंडबळीची घटनाही घडली आहे. या घटनेत आम्ही कोणालाही क्लिन चीट देत नाही, परंतु, या घटनेत जातीयवादाचा अँगल आहे. पोलिसांच्या वाहनांची जाळपोळ करण्यात आली. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे दोन जवान जखमी झाले आहेत. रेल्वेही अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या सगळ्या प्रकरणात जे सामील होते त्यांना याची किंमत मोजावी लागेल. जे काही करणे आवश्यक असेल ते आम्ही करू.
