गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदावरून सुरू असलेल्या चर्चेवर अखेर पडदा पडला आहे. कर्नाटकचे विद्यमान मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यावर भाजपाच्या दिल्लीतील नेतेमंडळींकडून दबाव असल्याच्या अनेक चर्चा या काळात रंगल्या. मात्र, आपल्यावर कोणताही दबाव नसून स्वेच्छेने मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचं येडियुरप्पांनी सोमवारी स्पष्ट केलं. या पार्श्वभूमीवर लवकरच नव्या मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर होण्याची शक्यता होती. त्यानुसार आता बसवराज बोम्मई यांच्या नावावर पक्षानं शिक्कामोर्तब केल्याचं समजतंय. पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी बसवराज बोम्मई यांची एकमताने निवड केल्याचं खुद्द येडियुरप्पा यांनीच जाहीर केलं आहे.

 

पंतप्रधानांचे मानले आभार!

बी. एस. येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देखील आभार मानले आहेत. “आम्ही एकमताने बसवराज बोम्मई यांची भाजपा विधिमंडळ नेतेपदी निवड केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या पाठिंब्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालीच बसवराज बोम्मई कठोर मेहनत घेतील”, असं येडियुरप्पा यांनी जाहीर केलं आहे. बोम्मई यांचा शपथविधी होईपर्यंत येडियुरप्पा कर्नाटकचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार आहेत.

 

कोण आहेत बसवराज बोम्मई?

येडियुरप्पांप्रमाणेच बसवराज बोम्मई हे देखील लिंगायत समाजाचे नेते असून ते येडियुरप्पांचेच निकटवर्तीय मानले जातात. ६१ वर्षीय बसवराज बोम्मई यांनी आत्तापर्यंत गृहविभाग, कायदे विभाग, सांस्कृतिक कार्यमंत्रीपद अशा अनेक महत्त्वाच्या पदांची जबाबदारी आत्तापर्यंत पार पाडली. मंगळवारी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्यापूर्वी बोम्मई यांनी भाजपाचे केंद्रीय निरीक्षक धर्मेंद्र प्रधान, जी. किशन रेड्डी आणि अर्जुन सिंह यांची बंगळुरूमध्ये भेट घेतली. याशिवाय, त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्यापूर्वी पक्षाच्या ४० आमदारांनी देखील त्यांची भेट घेतल्याचं देखील सांगितलं जात आहे.

येडियुरप्पा अखेर पायउतार – वाचा नेमकं काय घडलं!

२८ जुलै रोजी होणार शपथविधी!

दरम्यान, बसवराज बोम्मई यांचा बुधवारी म्हणजे २८ जुलै रोजी शपथविधी होणार असल्याचे संकेत भाजपा नेते के सुधाकर यांनी एएनआयशी बोलताना दिले आहेत. “सर्व भाजपा आमदारांनी एकमताने हा निर्णय घेतला आहे. फक्त पक्षातच नाही, तर पक्षाच्या बाहेर देखील बसवराज बोम्मई यांना मान आहे. ते बहुतेक उद्याच शपथ घेतील”, असं सुधाकर म्हणाले आहेत.