पीटीआय, भोपाळ

‘उजाले अपनी यादों के रहने दे हमारे साथ; न जाने किस गली में जिंदगी की शाम हो जाए’ यासारखी तरल शायरी लिहिणारे बशीर बद्र यांचे गुरुवारी निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत. बद्र यांना अनेक वर्षांपासून अवमनस्कतेच्या (स्मृतिभ्रंश) विकाराने ग्रासले होते. भोपाळमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती त्यांचा मुलगा सईद बद्र यांनी दिली.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी बद्र यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. ते शतकातील थोर कवींपैकी एक होते, असे यादव म्हणाले.  पद्मश्री पुरस्कारप्राप्त बशीर बद्र यांना स्मृतिभ्रंश झाल्यानंतर त्यांचा सार्वजनिक वावर कमी कमी होत गेला, किंबहुना त्यांनी जाणीवपूर्वक तसा निर्णय घेतला. ‘कुछ तो मजबूरियाँ रहीं होगी, यूँ ही कोई बेवफा नहीं होता,’ अशी उत्कट समंजसता व्यक्त करणारा शायर आपल्या आयुष्याच्या अखेरच्या काळात त्यांच्यावर प्रेम करणार्‍या व्यक्तींनाही अधूनमधून ओळखेनासा झाला. आपली स्मृती साथ देत नाही, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी गेल्या १० वर्षांमध्ये मुशायर्‍यांना जाणे बंद केले. बशीर बद्र हे त्यांच्या पिढीतील सर्वात लोकप्रिय कवींपैकी एक. सर्वाधिक उद्धृत झालेला शायर म्हणून ते ओळखले जात. आजच्या काळात आसपास द्वेष वाढीस लागला असताना, लोक एकमेकांना बरबाद करण्यासाठी सरसावले असताना रसिकांना बद्र यांचे ‘लोग टूट जाते हैं एक घर बनाने में, तुम तरस नहीं खाते बस्तीयां जलाने में’ आणि ‘रात का इंतजार कौन करे, आज कल दिन में क्या नहीं होता,’ हे शेर हमखास आठवतात.

बशीर यांच्या शायरीची तुलना अनेकदा मीर तकी मीर यासारख्या शायरांशी केली गेली. आकलनास सोप्या उर्दूतील त्यांचे शेर जनमानसांत प्रचंड लोकप्रिय झाले. ते खरे तर राहत इंदोरी यांचे समकालीन. पण राहत यांच्या शायरीत उघड राजकीय वा बंडखोर भूमिका दिसते. बशीर बद्र यांची कविताही त्याच जातकुळीतली. पण सौम्य. ती मुद्दा थेट मांडते; पण अलगदपणे. ही अलगदता बशीर बद्र यांच्या शायरीस एक नजाकत देऊन जाते.

इक सवारी आएगी; इक जाएगी

बारी बारी सबकी बारी आएगी

असं लिहून जाणार्‍या बशीर बद्र यांची सवारी आज मर्त्य लोकातून रवाना झाली.

दुश्मनी जम कर करो…!

भारत आणि पाकिस्तानदरम्यान १९७२ साली सिमला करार झाला तेव्हा बद्र यांनी लिहिलेल्या ‘दुश्मनी जम कर करो लेकिन ये गूंजाइश रहे, जब कभी हम दोस्त हो जाएँ तो शर्मिंदा न हों’ या ओळीही खूप गाजल्या. दोस्तयारांच्या खासगी संभाषणांपासून ते संसदेपर्यंत सर्वत्र या ओळींचा वापर केला गेला आहे. लोकसभेमध्ये २०१८ साली एका चर्चेदरम्यान काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून या ओळींचा वापर केला. त्याला उत्तर देताना, मोदींनी ‘जी बहुत चाहता है सच बोलें, क्या करें हौसला नहीं होता,’ या बशीर बद्र यांच्याच ओळींचा आधार घेतला होता.

अल्पचरित्र

बशीर बद्र यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९३५ रोजी कानपूरमध्ये झाला आणि बालपण अयोध्येत गेले. उर्दूबरोबरच हिंदी, पर्शियन आणि इंग्रजी या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. हायस्कुलात, सातवीत असताना ‘निगार’ या तत्कालीन नियतकालिकात त्यांची पहिली गझल छापून आली. त्यांच्या ‘आस’ या काव्यसंग्रहांमध्ये ६९ गझलांचा समावेश होता. या बद्र यांच्या उत्तम गझलांपैकी मानल्या जातात, या संग्रहाला १९९९मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. त्यांच्या  निवडक कवितांचा ‘कुल्लियाते बशीर बद्र’ हा संग्रह पाकिस्तानात प्रकाशित झाला होता. बद्र यांचे उर्दूमध्ये सातपेक्षा अधिक काव्यसंग्रह प्रकाशित झाले. त्याशिवाय एक हिंदी कवितासंग्रहही रसिकांच्या पसंतीस उतरला. ‘इकाई’, ‘इमेज’, ‘अहमद’, ‘आहट’ हे त्यांचे काही प्रसिद्ध गझलसंग्रह. स्वातंत्र्यानंतर उर्दू गझलांची साहित्यिक रचना आणि विसाव्या शतकातील गझल ही दोन समीक्षा पुस्तकेही त्यांनी लिहिली. ‘उजाले अपनी यादों के’, या पुस्तकातून देवनागरी लिपीतून उर्दू गझलांचा प्रयोगही त्यांनी केला. साधारण १९५० च्या दशकात भारतीय उर्दू लेखक-कवींमध्ये डाव्या विचारांचे आकर्षण होते,  पण बशीर बद्र त्यापासून दूर राहिले.

 बशीर बद्र यांचा जीवनप्रवास सोपा नव्हता. एप्रिल १९८७ मध्ये मेरठमध्ये झालेल्या दंगलीत त्यांचे घर जळाले. त्यात त्यांचे बरेसचे अप्रकाशित साहित्य जळून खाक झाले. त्यानंतर ते भोपाळला स्थलांतरित झाले आणि नव्याने सुरुवात केली. आपल्या शायरीनिमित्त त्यांनी अमेरिका, दुबई, कतार, पाकिस्तान या देशांसह जगभरात अनेक ठिकाणी भ्रमंती केली.

आज आपल्या उर्दू भाषेचे वैभव थोडे कमी झाल्यासारखे दिसते. बशीर बद्र यांच्या कविता अतिशय मधुर असत. हा शायर आणि त्यांची शायरी आपल्या स्मृतींमध्ये कायमची राहील. – जावेद अख्तर, कवी-गीतकार