Tirupati Laddu Row: आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) येथे प्रसाद म्हणून देण्यात येणारे लाडू २०२४ पासून वादात आहेत. शुक्रवारी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केलेल्या एका दाव्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. लाडू बनविणाऱ्या प्रसादच्या तूपात बाथरूम स्वच्छ करण्यासाठी वापरले जाणारे केमिकल मिसळले असल्याचा दावा केला. नायडू यांच्या दाव्यानंतर आता आंध्रप्रदेशमधील राजकारण तापले आहे. त्यांचा रोख माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याकडे असल्याचे सांगितले जाते. विरोधकांनी सदर आरोप फेटाळून लावले आहेत.
द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीनुसार, कुर्नूल येथील एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलत असताना नायडू यांनी हा दावा केला आहे. नायडू म्हणाले की, श्रीशैलम मंदिराच्या प्रसादातही अशी भेसळ झाली आहे.
प्रसादासाठी लाडू तयार करताना त्यात जनावरांची चरबी वापरली गेली असल्याचा आरोप झाला होता. या आरोपानंतर चंद्राबाबू नायडू यांनी टीडीपी पक्षाने वायएसआर काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला. हा अहवाल खोटा असल्याचा दावा वायएसआर काँग्रेसने केल्यानंतर आता मुख्यमंत्री नायडू यांनी नवा दावा केला आहे.
सीबीआयच्या आरोपपत्रात म्हटले आहे की, प्रसादाच्या तूपात तेल आणि डुकराची चरबी आढळून आलेली नाही. तर वनस्पती तेल आणि रसायनांचा वापर करून भेसळ करण्यात आली होती. २०१९ ते २०२४ या काळात प्रसादाच्या तूपात भेसळ करण्यात आली. यावेळी राज्यात वायएसआर काँग्रेस पक्षाचे सरकार होते आणि जगनमोहन रेड्डी मुख्यमंत्री होते.
नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले की, आरोपपत्रात झालेल्या ताज्या खुलाशांमुळे तिरुपती भक्तांमध्ये तीव्र संताप आणि वेदना निर्माण झाल्या आहेत. पवित्र तिरुपतीच्या लाडूमध्ये भेसळ करण्यासाठी शौचालय स्वच्छ करणारे केमिकल वापरण्यात आल्याचे भयंकर सत्य उघड झाले आहे.
टीडीपीने निवेदनात पुढे म्हटले की, LABSA हा अन्न श्रेणीत नसलेला आणि झिज होणारा औद्योगिक पदार्थ आहे. जो शरीराच्या अवयवांमध्ये जळजळ आणि अंतर्गत नुकसान करू शकतो. त्याचे सेवन केल्यास संभाव्य प्राणघातक परिणाम होऊ शकतात.
वायएसआरसीपीकडून प्रत्युत्तर
दरम्यान वायएसआर काँग्रेस पक्षाने टीडीपी आणि मुख्यमंत्री नायडू यांचे आरोप फेटाळून लावले असून राजकीय लाभासाठी जातीय भावना भडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप केला. माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी म्हणाले, राज्यातील एनडीए सरकारचा जंगल राज आणि तिरुपती लाडू प्रकरणात सुरू असलेल्या खोट्या प्रचाराचा भांडाफोड करण्यासाठी आमचा पक्ष सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रीय मानवधिकार आयोगाचा दरवाजा ठोठावणार आहे.

