करोना हे आपल्या सर्वाच्याच जीवनातील एक मोठे आव्हान आहे. त्याचा मुकाबला करण्यासाठी अभिनव मार्ग शोधून काढण्याच्या आवश्यकतेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर दिला आहे. दूरचित्रवाणी वाहिनीच्या प्रतिनिधींशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी संवाद साधला.

पंतप्रधानांनी सांगितले की, प्रसारमाध्यमांचे वार्ताहर, छायाचित्रकार, तंत्रज्ञ यांनी देशाची मोठी सेवा केली आहे. प्रसारमाध्यमांनी सध्याच्या निराशेच्या वातावरणात सकारात्मक संवादातून लोकांचे मनोबल वाढवण्याची गरज आहे. करोना विषाणूच्या साथीचे गांभीर्य प्रसारमाध्यमांनी लोकांना पटवून देण्यात मोठी भूमिका पार पाडली आहे. आपल्याला अजून बरीच मोठी लढाई लढावी लागणार आहे. त्यात वृत्त वाहिन्यांची भूमिका फार महत्त्वाची आहे. लोकांमध्ये सामाजिक अंतर राखण्याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. करोनाबाबत ताज्या घडामोडी व माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. सरकारचे महत्त्वाचे निर्णय लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे असते. ते काम वृत्तवाहिन्या लोकांना समजेल अशा भाषेतून करीत आहेत.

वृत्तवाहिन्यांना प्रतिसादही मिळत असतो व त्याच्या आधारे सरकारही पावले उचलत असते. वृत्तवाहिन्यांनी त्यांच्या वार्ताहरांना बूम मायक्रोफोन द्यावेत त्यामुळे त्यांना १ मीटर अंतरावरूनही मुलाखती घेता येतील अशी सूचना मोदी यांनी केली. वाहिन्यांनी वैज्ञानिक स्वरूपाच्या बातम्यातून लोकांना माहिती द्यावी, त्यावर चर्चा करून गैरमाहिती व अफवांच्या  प्रसाराचा मुकाबला करावा असे आवाहनही त्यांनी केले.

नागरिकांमध्ये शिस्तीची गरज असल्याचे सांगून ते म्हणाले की, सामाजिक अंतराचा म्हणजे दोन व्यक्तींमध्ये एक मीटर किंवा  सहा फूट अंतर ठेवण्याचा नियम पाळला गेला पाहिजे.

पंतप्रधान मोदी यांचे लोकांशी भावबंध जुळलेले आहेत त्यामुळे त्यांनी  वारंवार देशाला उद्देशून भाषणे करून  सूचना कराव्यात, बऱ्या झालेल्या रुग्णांच्या सकारात्मक गोष्टी सांगाव्यात अशी सूचना वृत्तवाहिन्यांनी पंतप्रधानांना केली.