दिल्लीत १६ डिसेंबर २०१२ रोजी एका मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिचा खून केल्याप्रकरणी बीबीसीने तयार केलेला माहितीपटाचे गुरुवारी पहाटे इंग्लंडमध्ये प्रसारण करण्यात आले. वास्तविक या माहितीपटाचे प्रसारण करू नये, अशी सूचना केंद्र सरकारने बीबीसीला केल्यानंतरही त्याला न जुमानता या वाहिनीकडून माहितीपटाचे प्रसारण करण्यात आले. न्यायालयाने या माहितीपटाचे भारतात प्रसारण करण्यावर अगोदरच बंदी घातली आहे.
इंग्लंडमधील प्रमाणवेळेनुसार बुधवारी रात्री दहा वाजता बीबीसी वाहिनीवर या माहितीपटाचे प्रसारण करण्यात आले. प्रसारण न करण्याची सूचना केल्यानंतरही या माहितीपटाचे प्रसारण केल्यामुळे केंद्र सरकार बीबीसीविरुद्ध कारवाई करणार का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पूर्वनियोजित वेळेनुसार येत्या ८ मार्च रोजी या माहितीपटाचे प्रसारण करण्यात येणार होते. मात्र, बीबीसीने आपला निर्णय बदलून आधीच त्याचे प्रसारण केले.
गृहमंत्रालयाने ही मुलाखत घेणाऱ्या चित्रपट निर्मात्या लेस्ली उदविन यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा मार्ग अवलंबण्याचे ठरवले आहे. तुरुंगामध्ये अशा मुलाखती घेण्याबाबत ज्या अटी व शर्ती आहेत त्या बदलून टाकण्याचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सूचित केले.
महिलाच बलात्कारासारख्या घटनांसाठी कारणीभूत असल्याचे विधान करून ‘निर्भया’ प्रकरणातील आरोपीचे उदात्तीकरण या मुलाखतीद्वारे करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप सर्वपक्षीय सदस्यांनी बुधवारी लोकसभेत केला. काँग्रेसच्या महिला खासदार रंजीत रंजन यांनी या मुद्यावर केंद्र सरकारचे लक्ष्य वेधले.
दरम्यान, दिल्ली येथे मुख्य महानगर दंडाधिकारी संजय खनगवाल यांनी ही मुलाखत प्रसारित किंवा प्रकाशित करण्यास मनाई हुकूम जारी केला आहे.
गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दोन्ही सभागृहात असे सांगितले की, माहितीपटात असलेली ही मुलाखत प्रसारित होणार नाही याची काळजी घेतली जाईल. तिहार तुरुंगात असलेल्या फाशीच्या गुन्हेगाराची मुलाखत घेण्याची परवानगी कशी देण्यात आली याची चौकशी केली जाईल. कुठल्याही परिस्थितीत ही मुलाखत प्रसारित करू दिली जाणार नाही.