BCI Chairman Manan Mishra Protest: बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन मिश्रा यांच्या विरोधात लीगल कॉक्रोच गुरुवार, २० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता आंदोलन करणार आहेत. मिश्रा यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन केले जाणार आहे. लीगल कॉक्रोचच्या या आंदोलनाला कॉक्रोच जनता पार्टीने पाठिंबा दिला आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी याबाबत माहिती एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन दिली आहे.

सौरव दास यांची पोस्ट

“लीगल कॉक्रोचेस एकत्र आले असून, ते उद्या सकाळी १० वाजता बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांविरोधात आंदोलन करणार आहेत आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहेत. हे आंदोलन ऑल इंडिया यंग अ‍ॅडव्होकेट्स असोसिएशनने पुकारले आहे. कोणत्याही प्रकारच्या शांततापूर्ण आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. मुंबई बार असोसिएशननेही आज मनन कुमार मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे”, अशी पोस्ट सौरव दास यांनी एक्सवरुन केली आहे.

गुरुवारी आंदोलन

सौरव दास यांच्या पोस्टनुसार, बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या दिल्लीतील कार्यालयासमोर सकाळी दहा वाजता हे आंदोलन होणार आहे.

मुंबई बार असोसिएशननेही केला निषेध

दरम्यान, बीसीआयच्या अध्यक्षांनी उशिरा माफी मागितली असल्याचे म्हणत मुंबई बार असोसिएशनने बुधवारी मनन मिश्रा यांच्या नालसार संबधित कृतीचा तीव्र शब्दांत निषेध केला. “मिश्रांनी मागितलेली माफी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केलेला एक प्रयत्न आहे, त्यात पश्चात्तापाची प्रामाणिक भावना नाही. मिश्रा यांनी बीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला हवा होता”, असेही असोसिएशनने १८ ऑगस्ट रोजी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

सीजेपीने दिला होता इशारा

बार कौन्सिल ऑफ इंडियाने हैदराबादमधील नॅशनल अकादमी ऑफ लीगल स्टडीज या विधी महाविद्यालयाच्या २०२६ च्या बॅचच्या विद्यार्थ्यांना वकिल म्हणून नोंदणी करण्यास मज्जाव करणारा आपला वादग्रस्त आदेश मागे घेतला. या प्रकारानंतर कॉक्रोच जनता पार्टीकडून बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार यांना इशारा देण्यात आला होता. सौरव दास यांनी मनन कुमार यांच्या वार्षिक खर्चाचा हिशोब मांडत विविध प्रश्न उपस्थित केले होते. तर, अभिजीत दिपकेंनी आता मनन कुमार यांचा राजीनामा मागण्याची वेळ आलीय का? असा सवाल केला होता.