भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त पंजाबमधील अमृतसर येथे अटारी-वाघा वॉर्डरवर ‘बीटिंग द रिट्रीट सेरेमनी’ (Beating Retreat Ceremony) आयोजित करण्यात आली आहे. यावेळी उपस्थित लोकांचा उत्साह दिसून येत आहे. अटारी सीमेवर बीटिंग रिट्रीट सेरेमनीस १९५९ मध्ये सुरूवात झाली होती. या दरम्यान भारत आणि पाकिस्तान देशांचे सैनिक संचलन करतात. हे संचलन पाहण्यासाठी देशभरातून लोक येतात.

बीटिंग द रिट्रीट सेरेमनी म्हणजे काय?

बीटिंग द रिट्रीट” ही एक जुनी लष्करी परंपरा आहे. पूर्वीच्या युद्धांमध्ये सूर्यास्त झाला की युद्ध थांबवले जायचे. ते थांबल्याची धून वाजवली जायची आणि मग दोन्ही बाजूंचे सैन्य त्यांच्या छावणीमध्ये परतायचे. या जुन्या पद्धतीवरुन ‘बीटिंग द रिट्रिट’ या सोहळ्याची संकल्पना रचण्यात आली आहे. भारतामध्ये १९५० पासून बीटिंग द रिट्रीटची परंपरा आहे.

१० हजार लोकांची सोहळा पाहण्यास गर्दी

कोरोनामुळे गेली २ वर्ष ‘बीटिंग द रिट्रीट’ सोहळ्यास उपस्थित राहण्यास प्रेक्षकांना बंदी घालण्यात आली होती. मात्र, आता ही बंदी उठवण्यात आली असून हा सोहळा पाहण्यासाठी भारतीय नागरिकांसोबत पाकिस्तानी नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती. अटारी ते अमृतसर अशी सुमारे ५ किलोमीटरची लांबलचक गाड्यांची रांग लागली होती. जवळजवळ १० हजार लोक हा सोहळा पाहण्यासाठी येत असतात.

१००० ड्रोनचा खास शो

यंदा पहिल्यांदाच  बीटिंग द रिट्रीट सोहळ्यामध्ये आयआयटी दिल्ली आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या मदतीने स्टार्टअप ‘बोटलॅब डायनॅमिक्स’ द्वारे ड्रोन शो आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेल्या सुमारे एक हजार ड्रोनचा समावेश आहे.