गोवा विधानसभेत संख्याबळाच्या बाबतीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे. पण सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपाल मृदृला सिन्हा यांची भेट घेतली तेव्हा काँग्रेसचे फक्त तीन आमदार हजर होते. त्याचवेळी भाजपाने बहुमत सिद्ध करण्यासाठी पाठिंबा देणाऱ्या सर्वच्या सर्व २१ आमदारांची नावे सादर केली असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर अडचणी येणार हे भाजपाने आधीच गृहित धरले होते. मनोहर पर्रिकर यांचे निधन झाल्यानंतर भाजपाने सत्ता स्थापनेच्या दृष्टीने लगेच हालचाली सुरु केल्या. पडद्यामागे गडकरींनी छोटया पक्षांबरोबर केलेल्या यशस्वी वाटाघाटींमुळे गोव्यात काँग्रेसची सत्ता स्थापनेची संधी हुकली. २०१७ साली झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने जास्त जागा जिंकूनही भाजपाने सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी सुद्धा पडद्यामागे नितीन गडकरी यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.

आता अमित शाह आणि नितीन गडकरी यांनी कुशलतेने परिस्थिती हाताळली व गोव्यात सत्ता कायम राखली. मनोहर पर्रिकरांच्या निधनानंतर आमचे संख्याबळ कमी झाले. सहाजिक आम्हाला अन्य छोटे पक्ष आणि अपक्षांची मदत लागणार होती. नव्या सरकारचे खातेवाटप निश्चित झाले असून हे सरकार चांगली कामे पुढे सुरु ठेवेल असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला.

काँग्रेसकडे १४ आमदार आहेत. पण राज्यपालांकडे फक्त तीन आमदार गेले. बहुमत सिद्ध करण्यासाठी आम्ही आम्हाला पाठिंबा देणाऱ्या सर्व आमदारांची नावे सादर केली. विधानसभेतही आम्ही बहुमत सिद्ध करु. आता कुठला हस्तक्षेप होण्याची शक्यता नाही असे गडकरींनी सांगितले. रविवारी संध्याकाळी मनोहर पर्रिकर यांचे कर्करोगाने निधन झाल्यानंतर भाजपाने सत्ता स्थापनेच्या दृष्टीने लगेच हालचाली सुरु केल्या.

भाजपाला पाठिंबा देणारे महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टी, गोवा फॉरवर्ड पार्टी आणि अन्य अपक्ष आमदारांनी बैठका सुरु केल्या होत्या. गोव्यामध्ये परिस्थिती हाताळण्याचा अनुभव असल्यामुळे भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने नितीन गडकरींना लगेच गोव्याला पाठवले. संपूर्ण रात्रभर गडकरींनी भाजपा सरकारला पाठिंबा देणाऱ्या सर्व आमदारांबरोबर समोरासमोर बसून चर्चा केली